सावकारी कर्जाचे ओझे उतरणार!

अनुप ताले
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केलेल्या जिल्ह्यातील जवळपास दहा हजार शेतकऱ्यांचे 15 कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार असून, याबाबतची अंतिम पात्र शेतकऱ्यांची यांदी लवकरच जाहीर होणार असल्याचे, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.

अकोला : सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केलेल्या जिल्ह्यातील जवळपास दहा हजार शेतकऱ्यांचे 15 कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे. याबाबत आतापर्यंत जिल्हास्तरीय समितीच्या दोन बैठकी झाल्या आहेत. लवकरच तिसरी बैठक होणार असून, त्यानंतर अंतिमतहः कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या व नावे जाहीर करण्यात येणार असल्याचे, जिल्हा उपनिबंधक डॉ.प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.

ज्या सावकारांनी त्यांच्या परवाण्यात नमुद नसलेल्या म्हणजेच कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना तारणी व विनातारणी कर्ज दिले होते, त्यांचे सुद्धा कर्ज माफ करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत नव्याने झाला होता. त्यानुसार ज्या सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांना असे कर्ज दिले व त्यांचेपैकी ज्यांनी परतफेड केली नाही, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफीची पात्र यादी तयार करण्यासाठी, तपासणी करण्याचे काम प्रशासनाद्वारे सुरू आहे. जिल्ह्यात या नुसार 139 सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेरील 36 हजार 540 शेतकऱ्यांना तारणी व विनातारणी कर्जवाटप केले होते. त्यापैकी 8938 शेतकऱ्यांनी आतापर्यंत कर्जाची परतफेड न केल्याचे दिसून आले आहे. सध्या ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये कर्जमाफीसाठी संभावित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या लावलेल्या आहेत. अंतिम पात्र यादी संदर्भात तलाठ्यांकडून अद्यापर्यंत 495 शेतकऱ्यांच्या तपासणी केलेल्या याद्या प्राप्त झालेल्या असून, जवळपास 400 शेतकरी पावने दोन कोटीच्या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. उर्वरित याद्या प्राप्त झाल्यानंतर व जिल्हास्तरीय समितीची तिसरी बैठक झाल्यानंतर अंतिम पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाणार असल्याचे, जिल्हा उपनिबंधक डॉ.प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.

लवकरच अंतिम यादी जाहीर होईल
139 सावकारांनी जिल्ह्यामध्ये कर्ज वाटप केलेल्या बहुसंख्य प्रकरणात, 36 हजार 540 लाभार्थी शेतकरी हे सावकारी परवान्यावरील नोंद केलेल्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील होते. त्यांची तलाठी व लेखापरिषकांकडून तपासणी करून अंतिम पात्र यादी केली जात आहे. याबाबत आतापर्यंत जिल्हास्तरीय समितीच्या दोन बैठकी झाल्या असून, 20 जानेवारीला तिसरी बैठक आहे. त्यानंतर अंतिम पात्र यादी जाहीर होईल. जवळपास दहा हजार शेतकऱ्यांना 15 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.
- डॉ.प्रवीण लोखंडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला

तारणी व विनातारणी कर्जाची परतफेड न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या
तालुका                 कर्जफेड न केलेल्या शेतकऱ्यांची संख्या
अकोला                                  8198
बार्शीटाकळी                            0000
पातूर                                       154
बाळापूर                                   206
तेल्हारा                                 0000
अकोट                                    284
मूर्तिजापूर                                 96
एकूण                                   8938
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers' loans taken from lenders will be forgiven