शेतकरी म्हणाले, वन्य प्राण्यांना ठार मारण्याची परवानगी द्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

भिवापूर (जि. नागपूर) : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील प्राण्यांकडून होत असलेल्या पिकांच्या नुकसानामुळे त्रासलेल्या पुल्लर, सोमनाळा, कोलारी व शेगाव येथील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 16) तहसील कार्यालयावर मोर्चा काढून हल्लाबोल आंदोलन केले.

भिवापूर (जि. नागपूर) : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील प्राण्यांकडून होत असलेल्या पिकांच्या नुकसानामुळे त्रासलेल्या पुल्लर, सोमनाळा, कोलारी व शेगाव येथील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 16) तहसील कार्यालयावर मोर्चा काढून हल्लाबोल आंदोलन केले.
कऱ्हांडला अभयारण्य हे शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरू पाहत आहे. यातील रानडुक्कर, हरीण, सांबर, नीलगायसारख्या वन्यप्राण्यांकडून शेतातील पिकांचे नुकसान केले जात आहे. तक्रारी करूनही वनविभागाकडून मोबदला मिळत नाही. पिकांची राखण करायची म्हटले तर हिंस्त्र प्राण्यापासून जिवाला धोका होण्याची भीती आहे. यामुळे सोमनाळा, पुल्लर, कोलारी, शेगाव येथील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यांनी कंटाळून सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले.
नुकसानाची एकरी 50 हजार रुपये भरपाई देण्यासह पीडित गावांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. पुनर्वसन करने शक्‍य नसेल तर नुकसान करणाऱ्या प्राण्यांना ठार मारण्याची परवानगी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. शेतात ये-जा करण्यासाठी जंगलामधून मार्गक्रमण करावे लागते. वनविभागाने या रस्त्यांवर आडव्या जाळ्या लावून रस्ते बंद केले आहेत. जाळ्या हटविण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व विलास भोंगाडे व सहदेव तांबे यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers said, allow wild animals to be killed