दुधात भेसळ कराल तर होणार कारवाई...दुग्ध व्यवसाय विकासमंत्र्यांनी सुनावले

गोंदिया : दूध खरेदी केंद्राची पाहणी करताना सुनील केदार.
गोंदिया : दूध खरेदी केंद्राची पाहणी करताना सुनील केदार.

गोंदिया : मागील चार महिन्यांपासून जिल्ह्यातील शासकीय दूध खरेदी केंद्र बंद असल्यामुळे त्याचा परिणाम शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर झाला होता. जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता सोमवार(ता. 11)पासून दूध खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या केंद्रावर उत्तम दर्जाचे दूध विक्रीसाठी आणावे, असे आवाहन दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी केले.

गोंदियाजवळील कुडवा येथील शासकीय दूध योजना केंद्रावर दूध खरेदी केंद्राचे श्री. केदार यांनी सोमवारी (ता. 11) फीत कापून उद्‌घाटन केले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यांनी लावली कार्यक्रमाला हजेरी

यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार विनोद अग्रवाल, मनोहरराव चंद्रिकापुरे, सहसराम कोरोटे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे, भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी हेमंत गडवे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी डी. आर. लाखे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्‍त डॉ. संजय गायगवळी, जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. राजेश वासनिक उपस्थित होते.

केंद्रावर आणा उत्तम दर्जाचे दूध

दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार म्हणाले, शासकीय दूध खरेदी केंद्रावर भेसळयुक्त दूध स्वीकारले जाणार नाही. दुधात भेसळ आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. ज्या दूध संकलन केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत, त्या शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न राहणार आहे. शासकीय दूध खरेदी केंद्रावर सोलर पॅनल लावून विजेचा खर्च कमी करावा. येथील शासकीय दूध खरेदी केंद्राची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

जिल्ह्यातील दूध उत्पादकांना लाभ

यासाठी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांचे सहकार्य अपेक्षित असून हे शासकीय दूध खरेदी केंद्र सुरू झाल्याने याचा लाभ जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री केदार यांनी केंद्राची पाहणी केली. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com