शेतकरीपुत्राच्या ड्रोनची आकाशाला गवसणी

रामेश्‍वर काकडे
रविवार, 20 जानेवारी 2019

वर्धा : अकोली जामणी (ता. सेलू) येथील शेतकऱ्याचा मुलगा शुभम नरेंद्र मुरले याने दोन वर्षांच्या परिश्रमानंतर ड्रोनचे यशस्वी उड्डाण करीत आकाशाला गवसणी घातली आहे. कोणत्याही प्रशिक्षित संस्थेत शिक्षण न घेता केवळ गुगल व सोशल मीडियाचा वापर करून त्याने हा ड्रोन तयार केल्याने तो सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे.

वर्धा : अकोली जामणी (ता. सेलू) येथील शेतकऱ्याचा मुलगा शुभम नरेंद्र मुरले याने दोन वर्षांच्या परिश्रमानंतर ड्रोनचे यशस्वी उड्डाण करीत आकाशाला गवसणी घातली आहे. कोणत्याही प्रशिक्षित संस्थेत शिक्षण न घेता केवळ गुगल व सोशल मीडियाचा वापर करून त्याने हा ड्रोन तयार केल्याने तो सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे.
शुभम दहावीत असताना त्याने "थ्री इडियटस्‌' चित्रपट पाहिला. त्यानंतर त्याच्या मनात आपणही ड्रोन बनवावा, अशी कल्पना आली. ही अतिशय खर्चिक बाब असल्याने त्यासाठीचे साहित्य घेणे त्याला परवडणारे नव्हते. परंतु 2016 मध्ये शुभमच्या वडिलांनी त्याच्या संशोधनाकरिता पदरमोड केली. अखेर एक डिसेंबर 2018 ला त्याच्या ड्रोनने यशस्वी उड्डाण केले. ड्रोन तयार करण्याकरिता त्याने यू ट्यूबवरून नवीन उपकरणांची माहिती घेतली. त्यानंतर ही उपकरणे तयार करण्याला सुरुवात केली. त्याकरिता चेन्नई, बेंगळुरू येथून त्याने यंत्राचे काही भाग विकत घेतले, तर काही साहित्य भंगारातून शोधत त्याचा उपयोग ड्रोनसाठी केला. सर्व प्रयोग यशस्वी झाले. पण ड्रोन उडविण्यासाठी रिमोटची आवश्‍यकता होती.
शुभम दहावीपर्यंत जामणीच्या श्रीकृष्ण हायस्कूलमध्ये शिकला. त्याने विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर तो वाणिज्य शाखेकडे वळला. शुभमला लहानपणापासून विद्युत उपकरणांसोबत खेळण्याचा छंद आहे. त्याच छंदातून त्याने हेलिकॉप्टरसुद्धा तयार केले. त्यानंतर ड्रोन तयार करण्याची कल्पना त्याच्या डोक्‍यात आली. त्यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज होती. वडील नरेंद्र मुरले यांनी शुभमला दहा हजार रुपये दिले. ड्रोन तयार करण्यासाठी अनेक अडचणी आल्या. काहीवेळा तो निराशही झाला; परंतु त्याने जिद्द व चिकाटीने ड्रोन यशस्वीरीत्या बनविला. आता जास्त वजन उचलण्याच्या क्षमतेचा ड्रोन तयार करून त्याद्वारे पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणे, माकड तसेच विविध वन्यप्राण्यांपासून शेतीपिकांच्या संरक्षणासाठी ड्रोनवर उच्चशक्तीचे लाइट लावून त्यावर वाघ, कुत्रा किंवा माणसाच्या आवाजाची ध्वनिफीत लावणे, त्याद्वारे रात्री वन्यप्राण्यांकडून होणारी पिकांची नासाडी थांबविणे हे शुभमचे पुढचे ध्येय आहे. उच्चशिक्षित नसूनही तंत्रज्ञानाची माहिती मिळवून शुभमने तयार केलेल्या ड्रोनमुळे त्याचे भविष्य निश्‍चितच उज्ज्वल आहे. तो नागपूर येथील डॉ. राजेश जोशी यांच्या एरोव्हिजन एरोमॉडेलिंग कंपनीत एरोमॉडलिंगचे चार वर्षांचे प्रशिक्षण घेत आहे. तो येथील न्यू आर्टस्‌ महाविद्यालयाचा बी.कॉम. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer's son drops skyline