esakal | स्वप्नाच्या वेलीला आली यशाची फुले, शेतकरी कुटुंबातील ऋतूराज झाला शासकीय अधिकारी
sakal

बोलून बातमी शोधा

ruturaj

परीक्षेचे प्रेशर असेल तर परफॉर्मन्सवर त्याचा विपरीत परिणाम होतो. नवागतांनी शक्‍य असेल तर राज्यसेवा आयोगाची परीक्षा देताना प्लॅन बी तयार ठेवावा, असे प्रांजळ मत ऋतुराज शिवदास सूर्य यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

स्वप्नाच्या वेलीला आली यशाची फुले, शेतकरी कुटुंबातील ऋतूराज झाला शासकीय अधिकारी

sakal_logo
By
दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : स्वप्न मोठे असेल आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर यश दूर नसते. हे एका शेतकरी कुटुंबातील मुलाने सिद्ध करून दाखविले. लहानपणापासून ठरविलेले त्या मुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

वडील शेतकरी कुटुंबातील आहेत. मात्र शालेय जीवनापासून ऋतूराजने शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितले. सातत्यपूर्ण अभ्यास व विषयावर फोकस ठेवून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली व जिल्हा उद्योग अधिकारी या पदावर माझी निवड झाली. मी पुणे येथे कंपनीत नेटवर्किंग अभियंता म्हणून कार्यरत होतो. त्यामुळे परीक्षेचे मनावर दडपण नव्हते. परीक्षेचे प्रेशर असेल तर परफॉर्मन्सवर त्याचा विपरीत परिणाम होतो. नवागतांनी शक्‍य असेल तर राज्यसेवा आयोगाची परीक्षा देताना प्लॅन बी तयार ठेवावा, असे प्रांजळ मत ऋतुराज शिवदास सूर्य यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

ऋतुराज हे पुसदजवळील वरुड गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील सिंचन विभागातून निवृत्त झाले असून शेती करतात तर आई अर्चना गृहिणी आहेत. वडिलांच्या नोकरी निमित्ताने त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंगरूळपीर येथे झाले.

अमरावती येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून त्यांनी कॉम्प्युटर सायन्स विषयात ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुणे येथे खाजगी कंपनीमध्ये नेटवर्क सपोर्टिंग इंजिनियर म्हणून काम केले. यादरम्यान इन्फोसिस कंपनीत असलेल्या मोठा भाऊ राहुल, वहिनी शिल्पा यांच्या प्रेरणेतून स्पर्धा परीक्षांची तयारी 2012 मध्ये सुरू केली. या अभ्यासातून त्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळाले. याच दरम्यान त्यांनी कंप्युटर मॅनेजमेंट अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

2017 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. स्टेट इंटेलिजन्स ऑफिसर म्हणूनही त्यांना संधी मिळाली. 2018 मध्ये त्यांनी नगरपरिषदेच्या राज्य सेवा भरतीत कर व प्रशासकीय अधिकारी ही परीक्षा उत्तीर्ण करून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरपालिकेत सेवा रुजू केली. दरम्यान त्यांचा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू होता. नुकत्याच लागलेल्या निकालात त्यांची जिल्हा उद्योग अधिकारी (तांत्रिक) या पदावर निवड झाली आहे. सध्या ते कोरोना वॉरियर म्हणून भद्रावतीत काम पाहत आहेत.

आपल्या यशाचे गुपित उघड करताना ऋतुराज यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासावर अधिक फोकस केल्याचे सांगितले. उच्च ध्येय ठेवले तर ते मिळविण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावे लागतात. यासाठी त्यांना त्यांचे मोठे बंधू, वहिनी यांचे पाठबळ मिळाले. नोकरी करीत असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी वेळेचे योग्य नियोजन केले. दररोज किमान आठ तास अभ्यास केला. त्यासाठी पुणे येथील नोकरी करताना नाईट शिफ्ट स्वीकारली. लायब्ररीत अभ्यास करताना हाती केवळ आठ तास असायचे. या वेळात त्यांनी अभ्यासक्रमाचे काटेकोर नियोजन केले. युनिक क्‍लासेस मधून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले व त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीत ध्येयपूर्तीला यशाची किनार लाभली.

सविस्तर वाचा - अरेच्चा! तो झाला प्रेयसी असलेल्या महिला पोलिसासह क्‍वारंटाईन अन्‌ बायको गेली पतीच्या शोधात पोलिस ठाण्यात

स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःचा प्लॅन बी तयार ठेवावा, असा सल्ला दिला. यापुढे आपण युपीएससीची तयारी सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले

संपादन - स्वाती हुद्दार

loading image