शेतकऱ्यांना कधी मिळणार उन्हाळी धानाचे चुकारे... रोवणीच्या कामासाठी गरज

सहदेव बोरकर
Saturday, 18 July 2020

तुमसर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना उन्हाळी धानाचे चुकारे न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले आहेत. हाती पैसा नसल्याने खरीप हंगामाची कामे कशी करावीत, असा प्रश्‍न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. आता रोवणीच्या कामासाठी शेतकऱ्यांना अडलेले चुकारे मिळण्याची अपेक्षा आहे.

सिहोरा (जि. भंडारा) : तुमसर तालुक्‍यातील सिहोरा परिसरात उन्हाळी धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाला योग्य भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी धानाची विक्री हमीभाव खरेदी केंद्रावर केली. मात्र, धान विकून दीड ते दोन महिने लोटूनही शेतकऱ्यांना धानाची रक्कम मिळाली नाही. आता खरीप हंगामात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

सिहोरा-बपेरा परिसरात जिल्हा मार्केटिंग कार्यालयाच्या उपअभिकर्ता संस्थेमार्फत तालुक्‍यातील केंद्रांवर शासकीय हमीभाव योजनेतून शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यात आली. शेकडो शेतकऱ्यांनी धान विक्री केली आहे. परंतु, त्यांना अद्यापही उन्हाळी धानाचे चुकारे मिळाले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे.

रक्कम बॅंक खात्यात जमा करा

सध्या खरीप हंगामातील धान रोवणी सुरू आहे. रोवणीकरिता ट्रॅक्‍टर भाडे, मजुरांची मजुरी, रासायनिक खते, कीटकनाशके आदी खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. हा सर्व खर्च करताना जे काही पैसे हातात होते, त्यातून बियाणे घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांचे हात रिकामे झाले आहेत. आता रोवणीच्या वेळी मजुरी व इतर खर्चासाठी वेगळी व्यवस्था करावी लागत आहे. अशावेळी उन्हाळी धानाचे चुकारे देण्यात यावे, संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधीने लक्ष देऊन तत्काळ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात रक्कम जमा करावी, अशी मागणी भारतीय किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष सुभाष बोरकर व शेतकऱ्यांकडून होत आहे.

जाणून घ्या : सडकछाप मजनूला तिने घडवली जन्माची अद्दल, वाचा काय झाला प्रकार...

दोन कोटींपेक्षा अधिक रक्कम

उन्हाळी हंगामात या केंद्रावर 12 हजार क्विंटलपेक्षा अधिक धानखरेदी करण्यात आली आहे. यातून शेतकऱ्यांचे दोन ते सवादोन कोटी रुपयांचे चुकारे थकित आहेत. तसेच गेल्या हंगामातील बोनसची रक्कमसुद्धा काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा विभागाकडून कधी रक्कम मिळणार याकडे लागल्या आहेत.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers wait for summer paddy cash