ह्रदयद्रावक घटना! मुलाला वाचवायला गेलेल्या वडिलाचाही तडफडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

दत्तात्रय घुगे मूळचे आकोट येथील सेवानिवृत्त वायरमन असून, मागील दहा वर्षांपासून कवठाबाजार येथे वास्तव्यास होते. बापलेकाच्या मृत्यूमुळे कवठाबाजार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आर्णी (जि. यवतमाळ) : विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्याने बापलेकाचा मृत्यू झाला. तर, दोघांना वाचविण्यासाठी गेलेला मामा गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता. पाच) पहाटे साडेतीन वाजतादरम्यान आर्णी तालुक्‍यातील कवठाबाजार येथे घडली.

दत्तात्रय केशव घुगे (वय 59), भावेश दत्तात्रय घुगे (वय 21, दोघेही रा. कवठाबाजार), अशी मृतांची नावे आहेत. भावेश पहाटे लघुशंकेसाठी उठला होता. अर्थिंग तारेला स्पर्श झाल्याने भावेश जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकून वडील दत्तात्रय घुगे त्याच्या मदतीला धावले. दोघांनाही विजेचा जोरदार धक्का लागल्याने खाली कोसळले.

हेही वाचा : लैंगिक अत्याचारातून युवतीला गर्भधारणा, पुढे घडला हा प्रकार...

त्यांना वाचविण्यासाठी भावेशचा मामा कैलास दहिफळे गेला असता, त्याच्याही बोटांना दुखापत झाली. गंभीर अवस्थेत दत्तात्रय घुगे व भावेश यांना तत्काळ आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, तपासणी करताच डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. घुगे मूळचे आकोट येथील सेवानिवृत्त वायरमन असून, मागील दहा वर्षांपासून कवठाबाजार येथे वास्तव्यास होते. बापलेकाच्या मृत्यूमुळे कवठाबाजार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father & son died due to electric shock