हिंगणघाट शहरात शंखी किड्यांमुळे मेंदूज्वराची भीती...नागरिकांपुढे नवेच संकट

प्रभाकर कोळसे
Sunday, 23 August 2020

गोगलगायी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसल्याने हा प्रकार कशामुळे झाला, असा प्रश्‍न‍ उपस्थित झाला आहे. एका घरातून सकाळच्या सुमारास २०-३० गोगलगायी टोपलीने भरून बाहेर काढाव्या लागत आहेत. घराचे दार उघडताच सकाळी गोगलगायींचा सडा पडलेला असतो. गोगलगाय मुळात हानिकारक नसली; तरी स्वतः नेमोटेड पॅरासाईटची वाहक असल्याने मेंदूज्वरसारखे आजार माणसांना उद्‌भवू शकतात.

हिंगणघाट (जि. वर्धा) : सर्वत्र कोरोना विषाणूचे सावट असताना हिंगणघाट येथे आता नव्याच संकटाचा सामना करावा लागत आहे. शहरातील रिठे कॉलनी परिसरात गत काही दिवसांपासून वेगळ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. या भागात घरात, विहिरीवर, भिंतीवर, वॉलकंपाउंडवर, छपरावर शंख असलेल्या गोगलगायी दिसू लागल्या आहेत. या गोगलगाईमुळे मेंदूज्वराचा धोका उद्‌भवत असल्याने नागरिकांत भीतीचे सावट आहे.

आतापर्यंत शेतात असलेल्या या गोगलगायी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसल्याने हा प्रकार कशामुळे झाला, असा प्रश्‍ उपस्थित झाला आहे.

एका घरातून सकाळच्या सुमारास २०-३० गोगलगायी टोपलीने भरून बाहेर काढाव्या लागत आहेत. घराचे दार उघडताच सकाळी गोगलगायींचा सडा पडलेला असतो. महिला, मुलांना याची भीती वाटत असल्याने घरच्या पुरुषांना सकाळी या गोगलगायींना उचलावे लागत आहे.

दक्षिण फ्लोरिडामध्ये सर्वप्रथम नोंद

१९६० च्या दशकात दक्षिण फ्लोरिडामध्ये सर्वप्रथम जायंट आफ्रिकन गोगलगाय (लिसाचॅटिना फुलिका किंवा जीएएस) सापडली. त्यांच्या निर्मूलनासाठी १० वर्षे कालावधी लागला. २०११ मध्ये त्याचे पुनरुत्पादन करण्यात आले आणि सध्या निर्मूलनाचे प्रयत्न चालू आहेत. जीएएस ही जगातील सर्वात हानिकारक गोगलगायींपैकी एक आहे. या गोगलगायमुळे परजीवी नेमोटेडदेखील ठेवता येतो. ज्यामुळे मानवांमध्ये मेंदूज्वर होऊ शकतो. जगातील सर्वात हानिकारक गोगलगाईंपैकी एक. जीएएस त्वरित पुनरुत्पादित करते, एका वर्षात सुमारे १२०० अंडी तयार करते.

नेमोटेड पॅरासाईटची वाहक

शंख गोगलगाय मानवी आरोग्यावर परिणाम करते. कारण ती बॅक्‍टेरीया, वॉर्म, नेमोटेड पॅरासाईटसारख्या जंतूचा वाहक आहे. गोगलगाय मुळात हानिकारक नसली; तरी स्वतः नेमोटेड पॅरासाईटची वाहक असल्याने मेंदूज्वरसारखे आजार माणसांना उद्‌भवू शकतात. या गोगलगायीवर असणारे बॅक्‍टेरिया, परजीवी नेमोटेड मानवाच्या स्पायनल कार्डवर आघात करून मेंदूज्वरसारखे महाभयंकर आजार उद्‌भवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

असं घडलंच कसं : शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका! आता "डिफॉल्ट' खात्यांमुळे पीककर्जाचे वांधे

जगभरात ५५ हजारांवर निरनिराळ्या प्रजाती
काही नागरिक गोगलगायींचा त्रास कमी व्हावा म्हणून त्यांच्यावर मीठ, फिनाईलची फवारणी करीत आहेत. गोगलगाय शंख हा मृदुकाय आणि उदरपाद वर्गात येणारा प्राणी आहे. गोगलगायीच्या शरीरावर कवच असते. यालाच शंख असेही म्हणतात. शंखावरील गोगलगाय आपले शरीर शंखात आक्रसून घेते. या गोगलगाईचे शास्त्रीय नाव लिसाचॅटिना फुलिका किंवा जीएएस, असे आहे. जगभरात या गोगलगाईच्या आजपर्यंत ५५००० निरनिराळ्या जाती शास्त्रज्ञांनी नमूद केल्या आहेत.
- प्रा. गौरव घुगरे, हिंगणघाट.

 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fear of meningitis due to snail in Hinganghat city