
नागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) लर्निंग लायसन घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने एका महिला आरटीओ अधिकाऱ्याला अटक केली. महिला अधिकाऱ्याला न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. संजीवनी चोपडे (वय 38, रा. फ्रेंड्स कॉलनी, नागपूर) असे अटक केलेल्या आरटीओ अधिकाऱ्याचे नाव आहे. या कारवाईमुळे आरटीओमध्ये एकच खळबळ उडाली असून अनेकांनी
कारवाईची धास्ती घेतली आहे.
आरटीओ विभागातील तब्बल 9 अधिकारी-कर्मचारी या घोटाळ्यात अडकले असून 7 अन्य दलालांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजीवनी चोपडे या नागपूर प्रादेशिक परिवहन विभागात सहायक मोटारवाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या विभागात एप्रिल 2017 ते मार्च 2018 या कालावधीत लर्निंग लायसन्स घोटाळा झाला होता. दोन वर्षांपूर्वी नागपूर आरटीओमध्ये अनेक घोटाळे झाले. प्रचंड वादग्रस्त असलेला वर्ध्याचा एक अधिकारी येथे नियुक्त झाला. त्याने भ्रष्टाचाराला रान मोकळे करून दिले होते. त्यामुळे लर्निंग लायसन्स, एन्ट्री फी, पासिंगसह अनेक घोटाळे सुरू झाले. त्याचा बोभाटा झाल्याने या अधिकाऱ्याची हकालपट्टी झाली. दरम्यान, आरटीओतील लर्निंग लायसन्सचा घोटाळा उघड झाला. अधिकारी-एजंटसह 13 जणांविरुद्ध सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात संजीवनी चोपडे हीसुद्धा आरोपी आहे. गुन्हे शाखेचा आर्थिक विभाग (ईओडब्ल्यू) या घोटाळ्याचा तपास करीत आहे. यापूर्वी तीन एजंटांना अटक झाली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे सोमवारी सकाळी चोपडे यांच्या फ्रेण्डस् कॉलनी, गिट्टीखदानमधील घरी त्यांना अटक करण्यासाठी धडकले. त्यांनी संजीवनी चोपडे यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या घडामोडीमुळे आरटीओत प्रचंड खळबळ निर्माण झाली.
वादग्रस्त अधिकारी रडारवर
भ्रष्टाचाराचा अड्डा म्हणून चर्चेत असलेल्या आरटीओ एसीबीच्या रडारवर आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून प्रचंड वादग्रस्त ठरलेल्या अधिकाऱ्यानेच हा गैरप्रकार पुन्हा सुरू करवून घेतला आहे. त्यासाठी या अधिकाऱ्याने कोल्हापुरी साथीदारांच्या माध्यमातून कुख्यात "नाईक-खान'च्या टोळीला वाहनचालकांकडून वसुली करण्याचे कंत्राट दिले आहे. नाईक-खानची टोळी कुख्यात आंबेकरच्या टोळीशी जुळलेली असल्याचे सांगितले जाते.
लाखो रुपयांची वरकमाई
गेल्या 27 सप्टेंबरला परिवहन आयुक्तांच्या आदेशाने सहायक आरटीओ मार्तंड नेवासकर यांनी सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी सहायक आरटीओ संजीवनी चोपडे यांच्यासह अभिजीत खरे, शैलेश कोपुल्ला, विलास टेंगने, संजय पल्लेवाड, मंगेश राठोड, मिथुन डोंगरे, कनिष्ठ लिपिक दीपाली भोयर, तत्कालीन प्रणाली प्रशासक प्रदीप लेहगावकर, दलाल अश्विन सावरकर, राजेश देशमुख, आशीष भोयर, अरुण लांजेवार, उमेश धिवधोंडे, यूटीएल कर्मचारी उमेश पानतावणे आणि ऑरेंज इन्फोटेक प्रा. लि. कंपनीचे संचालक जेरम डिसूजा यांच्यासह 17 जणांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.
तीन दलालांना यापूर्वीच अटक
लर्निंग लायसन्स स्कॅममध्ये आरटीओ अधिकाऱ्याला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी दलाल अश्विन सावरकर, आशीष भोयर आणि यूटीएल कर्मचारी उमेश पानतावणे यांना अटक करण्यात आली होती. या स्कॅममध्ये एआरटीओ संजीवनी चोपडे हिचे दलालांशी सोटेलोटे समोर आले आहे. चोपडे हिने शासकीय लॉग इन आयडी आणि पासवर्ड एका खासगी नेटकॅफेवर वापरून लर्निंग लायसन्स दिल्याचे पीआय हेमंतकुमार खराबे यांनी केलेल्या चौकशीत समोर आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.