आरोग्याची गुढी उभारावयाची असेल तर काही काळ घरीच थांबा

pusad.
pusad.

यवतमाळ : कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला जेरीस आणले आहे. ' महामारी 'ची दहशत तर महाराष्ट्रात दिवसागणिक वाढते आहे. विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी देशाच्याच नव्हे तर राज्य व जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. संचारबंदीने सारे जीवनमान ठप्प झाले आहे. कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी घरातच थांबण्याचे आवाहन प्रशासनाद्वारे वारंवार केले जात आहे. मात्र, लोक गांभीर्याने घेत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. अशा स्थितीत कोरोनाच्या तिसऱ्या अवस्थेत आपण प्रवेश केल्यास भविष्यात मरणकळांना कवटाळण्याशिवाय आपल्या हाती काही राहणार नाही. जिल्ह्याचा विचार करता कोरोनाचा प्रकोप झाल्यास अस्तित्वात असलेली संपूर्ण आरोग्य यंत्रणा 'पॅरालाईज ' होण्याची भीती आहे.

सध्या यवतमाळ जिल्ह्यात वसंतराव नाईक मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना रुग्ण व संशयित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात आले आहे. तसेच तालुक्‍याच्या ठिकाणीही व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात पुसद, दारव्हा, पांढरकवडा या तीन ठिकाणी उपजिल्हा रुग्णालये आहेत. मात्र, रुग्णांच्या बेडची संख्या अत्यल्प आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात या सुविधांची वानवा आहे. डॉक्‍टर्स, कर्मचारी यांची संख्या पुरेशी नाही. एकूणच या तोकड्या व्यवस्थेत कोरोनाचा 'आऊटब्रेक' झाला तर संपूर्ण आरोग्य यंत्रणाच 'पॅरालाईज' होण्याची मोठी भीती आहे. कोरोना बाधित रुग्णांसाठी 'व्हेंटिलेटर'ची आवश्‍यकता असते. पुसद उपजिल्हा रुग्णालयात ही व्यवस्था नाही व जिल्हा रुग्णालयात बोटावर मोजण्याएवढे हे यंत्र आहेत. दुर्दैवाने कोरोनाचा प्रकोप वाढल्यास जगातील आरोग्य सुविधेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इटली पेक्षाही कित्येक पटीने भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोलमडली तर मृत्यूच्या तांडवनृत्याची कल्पनाच न केलेली बरी !

आरोग्य तज्ज्ञ डॉ. कौशिक कांत यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली आरोग्य यंत्रणा विषयक माहिती चिंताजनक आहे. आपल्या संपूर्ण देशात एकूण 15 लाख बेड आहेत. त्यापैकी दीड लाख आयसीयू आहेत. आपला देश 130 कोटींचा आहे. त्यापैकी एक टक्का लोकांना कोरोना झाल्यास संपूर्ण आरोग्यसेवा कोलमडून पडेल. हा धोका लक्षात घेत लोकांनी प्रशासनाचे आदेश पाळावे व संसर्ग टाळण्यासाठी घरातच थांबावे, अशी कळकळीची हाक त्यांनी दिली. देशाला 'लॉक डाऊन' शिवाय आजच्या घडीला पर्याय नाही. कोरोनाचा उद्रेक झाल्यास पैसा असणाऱ्यांनाही भरती करायला हॉस्पिटलमध्ये जागा राहणार नाही. यासंदर्भात इटली आणि स्पेन मध्ये अडकून पडलेल्या मराठी युवकांनी वास्तव स्थितीचे केलेले दर्शन चित्रफितीच्या माध्यमातून लोकांनी ऐकले आहे. त्यांनी केलेले कळकळीचे आवाहन तरी मनावर घ्या, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्यास कोणीही वाचवू शकणार नाही. अन्यथा, भीषण प्रलयानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला शून्यातून सुरुवात करावी लागेल.

आरोग्याची उभारा गुढी !
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात चैत्रमासाचा आरंभ बुधवार ता. 25 रोजी होत आहे. साडेतीन मुहूर्तचा हा मराठी सण 'गुढीपाडवा' कोरोनाच्या सावटात आला आहे. संचारबंदीत घराबाहेर न पडता घरातच थांबून हा सण साधेपणाने साजरा करावा. गुढीपाडवा म्हणजे 'महापर्वा'ची सुरुवात. या पर्वावर 'महामारी' हटविण्याची शपथ घेतली पाहिजे. 'आरोग्याची गुढी उभारावयाची असेल तर काही काळ घरीच थांबा', हा संदेश मराठीजनांनी मनापासून आत्मसात केला पाहिजे. त्यातूनच गुढीपाडव्याची पहाट जगता येईल.
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी 'फक्त भारतच कोरोनाला हरवू शकतो,' असा विश्वास प्रकट केला आहे. 'लॉकडाऊन' सारखी कठोर पावले उचलून भारताने योग्य दिशेने कारवाई केली आहे. कोरोनाला हरविणे आपल्या हातात आहे. "आपण थांबूया, कोरोना थांबवूया "हा मंत्र आचरणात आणल्यास कोरोनाच्या संकटातून निकोप आरोग्याची गुढी उभारता येईल, एवढे नक्की  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com