
अमरावती : सरत्या पंचवार्षिकमधील महापालिकेची अखेरची आमसभा मारहाणीचा प्रयत्न करण्यावरून चांगलीच गाजली. एमआयएमचे गटनेते अब्दुल नाजीम यांनी बसपचे गटनेते चेतन पवार यांच्या अंगावर सभागृहातच चालून गेले. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. अखेर सभा दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली.
साफसफाई कंत्राटाची पहिली तीन वर्षांची मुदत संपल्याने मुदतवाढ देण्याचा मुद्दा चर्चेला होता. स्थायी समितीने सफाईचे कंत्राट तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने करण्यात यावा असा विषय चर्चा करून निर्णय घेण्यासाठी पाठविला होता. माजी महापौर मिलिंद चिमोटे, विलास इंगोले व प्रकाश बनसोड यांनी कंत्राटदारांनी कर्ज काढून स्वच्छतेचे काम केले असल्याने मावतेच्या दृष्टीने त्यांना एक वर्षाची मुदतवाढ द्यावी असे मत मांडले.
कोरोना काळातही या कंत्राटदारांनी चांगले काम केल्याचा उल्लेख त्यांनी प्रामुख्याने केला. बसपचे गटनेते चेतन पवार यांनी या विषयावर मत व्यक्त करताना कंत्राटदारांची वकिली का केली जात आहे, असा सवाल केला. त्यावर प्रकाश बनसोड यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यावरून त्यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. हा वाद शांत होत नाही तोच एमआयएमचे गटनेते अब्दुल नाजीम यांनी वकिली हा शब्दप्रयोग सभागृहात वापरणे योग्य वाटत नसून पवार यांनी तो मागे घ्यावा व सभागृहाची क्षमा मागावी, असे मत मांडले.
मात्र, त्यास चेतन पवार यांनी ‘अरे हट’ असा शब्दप्रयोग केल्याने चांगलाच वाद पेटला. पवार यांच्या या शब्दप्रयोगाने नाजीम चांगलेच भडकले व त्यांनी आसन सोडून पवार यांच्या दिशेने धाव घेतली. नाजीम यांना रोखण्यासाठी काही सदस्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्या दरम्यान एमआयएमचे सदस्य इम्रान खान व अफजल हुसेन यांनीही पवार यांच्या दिशेने धाव घेतली.
इतक्यात नाजीम यांनी सुटका करून घेत पुन्हा पवार यांच्याकडे धाव घेत त्यांच्यासोबत मारहाणीचा प्रयत्न केला. उभयतांमध्ये काही सेकंद एकमेकास मारण्याचा प्रयत्न झाला. इतर सदस्यांनी मध्यस्ती केल्याने पुढील अनर्थ टळला. महापौर यांनी दहा मिनिटांसाठी सभा तहकूब केली. पुन्हा सभा सुरू झाल्यानंतर महापौरांनी स्वच्छता कंत्राटाचा निर्णय प्रशासनाने घ्यावा असा निर्णय दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.