esakal | फिटले अंधाराचे जाळे, झाला मोकळा प्रकाश! अखेर अतिदुर्गम कुच्चेर गावात पोहोचली वीज
sakal

बोलून बातमी शोधा

electricity

तालुका मुख्यालयापासून 15 किमीवर नारगुंडा हे गाव असून येथे पोलिस मदत केंद्र आहे. तिथपर्यंत वीज जोडणी आहे. मात्र नारगुंडावरून पाच किमी अंतरावरील कुच्चेर गावापर्यंत कित्येक वर्षांपासून वीजखांब व तार जोडूनही वीजपुरवठा सुरू करण्यात आला नव्हता.

फिटले अंधाराचे जाळे, झाला मोकळा प्रकाश! अखेर अतिदुर्गम कुच्चेर गावात पोहोचली वीज

sakal_logo
By
लीलाधर कसारे

भामरागड (जि. गडचिरोली) : हातात ऍन्ड्रॉईड, समोर लॅपटॉप, एसी रुम अशा सोयीसुविधांमध्ये जगणारी शहरी जनता घरात साधा दिवाही नसलेल्या आदिवासींचे दु:ख कसे समजू शकणार? किंबहुना अशी परिस्थिती असते, यावर विश्‍वास ठेवणेच शहरी नागरिकांसाठी कठीण आहे, मात्र हे सत्य आहे.

तालुका मुख्यालयापासुन 20 कि. मी. अंतरावरील अतिदुर्गम आदिवासी गाव कुच्चेर स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही विजेअभावी अंधारात होते. मात्र नारगुंडा पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे अखेर तिथे वीज जोडणी करण्यात आली आणि वीजपुरवठा सुरू झाल्याने कुच्चेर गाव प्रकाशमान झाले. त्यामुळे नागरिकांनी पोलिस व प्रशासनाला धन्यवाद देत आनंदोत्सव साजरा केला.

तालुका मुख्यालयापासून 15 किमीवर नारगुंडा हे गाव असून येथे पोलिस मदत केंद्र आहे. तिथपर्यंत वीज जोडणी आहे. मात्र नारगुंडावरून पाच किमी अंतरावरील कुच्चेर गावापर्यंत कित्येक वर्षांपासून वीजखांब व तार जोडूनही वीजपुरवठा सुरू करण्यात आला नव्हता.

परिणामी गावकऱ्यांना अंधाराचा सामना करावा लागत होता. या बाबतीत नारगुंडा पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक किरण वाघ यांनी वरिष्ठांकडे व वीज वितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला. तसेच गावकऱ्यांनी अनेकदा वीज जोडणीची मागणी केली होती. याबाबत पत्रकारांनी वृत्त प्रकाशित केले होते. या सर्वांची दखल वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता प्रभाकर मेश्राम यांनी घेतली.

कित्येक वर्षांपासून रखडलेल्या कामाला सुरुवात झाली. वीजवितरण कंपनी भामरागडचे कनिष्ठ अभियंता पंकज तेली यांनी कुच्चेर गावी यशस्वीपणे वीज पुरवठा सुरू केला. यावेळी वीज ट्रान्सफॉर्मरचे उद्‌घाटन नारगुंडा पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक तुकाराम खडके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नारगुंडाचे पोलिस उपनिरीक्षक दयाराम वनवे, लाईनमन दाडे, विद्युत सहायक शशिकांत ढोले, सुपरवायझर प्रफुल्ल वाघाडे आदी उपस्थित होते.

शासन प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे आजही भामरागड तालुक्‍यातील अनेक आदिवासी गावांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. पक्‍के रस्ते, वीज, आरोग्य अशा मुलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. भामरागड तालुका अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो. तालुक्‍यात रस्त्यांपाठोपाठ विजेची समस्याही बिकट झाली आहे.

जेमतेम 17 ते 18 घरांची आदिवासी वस्ती कुच्चेर गाव हे तालुका मुख्यालयापासून अवघ्या 20 किमी अंतरावर आहे. तरीही येथे वीज पोहोचायला सात दशके लागली. कुच्चेर गावातील नागरिक मागील अनेक वर्षांपासून वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी करीत होते. 10 वर्षांपूर्वी या गावातून समोरील खंडी नैनवाडीपर्यंत वीजखांब तार जोडण्यात आल्या होत्या. पण, वीज जोडणी झाली नव्हती. याबाबतीत नारगुंडा पोलिसांनी जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी जिल्हाधिकारी व वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून कुच्चेर गावातील वीजपुरवठा सुरू करण्यासाठी कळविले होते.

सविस्तर वाचा - नागपूर झेडपी अध्यक्षांचे पती कोरोना पॉझिटिव्ह!

पोलिसच तारणहार
दर पाच वर्षांनी मतांचा जोगवा मागणाऱ्या लोकप्रतिनिधींवरील आदिवासींचा विश्‍वास उडत चालला आहे. गावातील हातपंप बंद पडला, गावात ग्रामसेवक येत नसेल, शिक्षक गावात राहत नसेल किंवा कोणत्याही लहानसहान समस्यादेखील नागरिक आता पोलिस मदत केंद्रात जाऊन सांगतात किंवा पत्रकारांना सांगतात. पोलिस विभागसुद्धा नागरिकांच्या समस्येची तत्काळ दखल घेऊन ती समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अतिदुर्गम भागांत पोलिसच नागरिकांचे तारणहार म्हणून भूमिका बजावत आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार