गांधीजींच्या प्रेरणेतील भद्रावतीच्या ग्रामोदय संघाला अखेर घरघर...वाचा सविस्तर

file photo
file photo

भद्रावती (जि. चंद्रपूर) : एकेकाळी सोनेरी दिवस अनुभवलेल्या भद्रावती येथील ग्रामोदय संघाला अलीकडे आर्थिक ग्रहण लागलेले आहे. सध्या संघाचा कारभार शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीवर कसाबसा सुरू आहे. शहरातील ग्रामोदय संघ हा देशातील पहिला सिरॅमिक असल्यामुळे त्याला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वातंत्र्य चळवळीतील महात्मा गांधी यांचे सहकारी स्व. कृष्णमूर्ती मिरमिरा यांनी महात्माजींच्या प्रेरणेतून भद्रावती शहरात १९५०मध्ये ग्रामोदय संघाची स्थापना केली होती.

शहरातील दरिद्री अवस्थेत जीवन जगणाऱ्या कुंभार समाजाच्या पारंपरिक कुंभारकामात अद्ययावतपणा आणून त्यांचे आर्थिक उत्थान व्हावे, हा उद्देश ग्रामोदय संघाच्या भावनेमागे होता. कृष्णमूर्ती हे सिरॅमिकमधील तज्ज्ञ होते. संघाची स्थापना झाल्यानंतर कृष्णमूर्ती यांनी स्वत: जपानला जाऊन व तेथे राहून सिरॅमिक उद्योगाचे बारकावे हस्तगत केले. त्यानंतर भद्रावती येथे येऊन आपल्या कल्पकतेने लोहाराच्या साहाय्याने आवश्‍यक असलेली यंत्रे ग्रामोदय संघात बसविली. यात स्थानिक कुंभार बांधवांना रोजगार मिळून त्यांची आर्थिकस्थिती सुधारली.

ग्रामोदय संघातील उत्पादकांनी नाव कमावले

याच माध्यमातून अनेक कुंभार कारागिरांनी प्रशिक्षण घेऊन या उत्पादनात कौशल्य मिळवित स्वत:चा स्वयंरोजगार सुरू केला.
त्या काळात आपल्या अलौकिक दर्जामुळे ग्रामोदय संघातील उत्पादकांनी नाव कमावले. येथे निर्माण केलेल्या चिनी मातीच्या कलाकृतींची किमत पन्नास ते साठ हजाराच्या दरम्यान आहे. या अलौकिक प्रतिकृती महानगरातील धनदांडग्यांच्या दिवाणखान्याची शोभा वाढवीत आहेत. या महागड्या प्रतिकृती विकण्यासाठी ग्रामोदय संघातर्फे मुंबई, दिल्ली, चेन्नई अशा मोठ्या महानगरामधून प्रदर्शन लावले जाते.


चिनीमातींच्या भांड्यांचे महत्त्व कमी

मध्यंतरी ग्रामोदय संघात तयार होणाऱ्या चिनी मातींच्या लोणच्यांच्या बरण्या व मंगलोरी कवेलू चांगलीच लोकप्रिय झाली होती. मंगलोरी कवेलूची मागणी लक्षात घेता संघाने जिल्ह्यात इतरत्रही कवेलूचे कारखाने उघडले होते. मात्र, काळाच्या ओघात या चिनीमातींच्या भांड्यांचे महत्त्व कमी झाले. प्लॅस्टिक बाजारात आल्यानंतर येथील संपूर्ण उद्योग संकटात आले. कवेलूंची व बरण्यांचे उत्पादन काळाच्या ओघात बंद पडले.

खादी ग्रामोद्योगच्या वतीने सिरॅमिकचे प्रशिक्षण

महागड्या प्रतिकृती या सहज विकल्या जात नसल्यामुळे संघाला आर्थिक चणचण जाणवू लागली. अशातच कृष्णमूर्ती मिरमिरा यांचे निधन झाले. त्यांच्या उपरांत संघाचे अध्यक्ष जितेंद्रकुमार आणि व्ही. श्रीवास्तव यांनी संघाचा कारभार समर्थपणे सांभाळला आहे. आता या संघातून खादी ग्रामोद्योगच्या वतीने सिरॅमिकचे प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी संपूर्ण देशातील कानाकोपऱ्यातून प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी येथे येत असतात. त्यांच्या राहण्याची व खाण्याची सोय येथे केली जाते. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शिष्यवृत्तीही दिली जाते.


ग्रामोदयचे पुनरुज्जीवन होईल
सध्या ग्रामोदय संघाला शासनाकडून खादी ग्रामोद्योग विभागाकडून आर्थिक मदत पुरविली जाते. या मदतीच्या साहाय्याने ग्रामोदय संघाचे पुनरुज्जीवन होईल, असा विश्‍वास आहे.
- जितेंद्रकुमार
अध्यक्ष, ग्रामोदय संघ, भद्रावती.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com