मृताच्या कुटुंबीयांना तेरवीच्या दिवशीच केली आर्थिक मदत 

मोहन सुरकार 
Wednesday, 28 October 2020

भोई समाजाने कोरोनामुळे आकस्मिक दुर्दैवी मृत्यू पावलेल्या कोटेश्वर सदाशिव दाते (वय ४३)  यांच्या कुटुंबाला "भोई समाज मदत ग्रुप"च्या माध्यमातून समाजबांधवांनी सामूहिक वर्गणी करीत १३ हजार ५० रुपयांचा धनादेश मृताच्या तेरवीच्या दिवशी कुटुंबीयांना देऊन नवीन आदर्श निर्माण केला आहे.

सिंदी रेल्वे (जि. अमरावती) : कोणत्याही कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे जेव्हा आकस्मिक निधन होते. तेव्हा त्या परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळतो. यावेळी प्रत्येकाचे नातेवाईक, संबंधित लोक आणि समाज बांधव सर्व चार दिवस मोठे दुःख, हळहळ व्यक्त करतात. मात्र या परिवाराला अशा परिस्थितीत ज्या बाबीची नितांत गरज आहे ती आर्थिक मदत कोणीच करताना दिसत नाही.

विशेष म्हणजे सर्वच समाजात यावेळी पिढ्यानपिढ्यांपासून चालत आलेले अंतविधी, कडुघास जेवण, दशक्रिया, अस्थिविसर्जन, तेरवी, गोडजेवण, अकरमासे आदी करण्यावर भर देतो. मग तो परिवार कोणत्याही परिस्थितीत असो. असेच काही चित्र आपल्याला सर्वच समाजात कमीअधिक प्रमाणात पाहण्यात येते. मात्र शहरातील भोई समाजाने कोरोनामुळे आकस्मिक दुर्दैवी मृत्यू पावलेल्या कोटेश्वर सदाशिव दाते (वय ४३)  यांच्या कुटुंबाला "भोई समाज मदत ग्रुप"च्या माध्यमातून समाजबांधवांनी सामूहिक वर्गणी करीत १३ हजार ५० रुपयांचा धनादेश मृताच्या तेरवीच्या दिवशी कुटुंबीयांना देऊन नवीन आदर्श निर्माण केला आहे.

महत्त्वाची बातमी - तुम्हालाही जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आहे? मग जरा थांबा आधी हे वाचा
 

सविस्तर वृत असे की, येथील वाॅर्ड क्रमांक १७ मधील रहिवासी कै. कोटेश्वर सदाशिव दाते (वय ४३ वर्ष) हे बुटीबोरीला खाजगी कंपनीत कामावर होते. त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले. यानंतर ते १५ दिवस कोरोना उपचारासाठी दवाखान्यात भरती होते. मात्र, त्यांच्या शरीराने उपचाराला प्रतिसाद न दिल्याने पंधारा दिवसांपूर्वी त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोटेश्वरच्या आकस्मिक मृत्यूमुळे तीन मुली आणि पत्नी अशा  दाते परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला.
 
ठरल्याप्रमाणे अनेकांनी चार दिवस खुप हळहळ, दुःख व्यक्त केले. मात्र सर्वसामान्य कुटुंबातील कर्ता पुरुष असा आकस्मिक मरण पावल्यावर त्या परिवाराची कशी आर्थिक कोंडी होते यांची कल्पनाच न केलेली बरी. अशावेळी या परिवाराला हवी असते महत्वाची ती आर्थिक मदत आणि हिच करण्याची आपल्याकडील सर्वच समाजात पध्दत नाही.
 
मात्र मागसलेला समाज म्हणून ज्या समाजाकडे सर्व पाहतात त्या समाजाच्या काही तरुण मंडळींनी यात पुढाकार घेऊन  "महाराष्ट्र भोई समाज मदत केंद्र ग्रुप"  या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या भोई समाजाने पुढाकार घेऊन दाते परिवाराला सावरण्याचे काम  केले. 

या समाजकार्यसाठी  पुढाकार घेणारे शरद  दाते यांनी मदत गोळा करण्यात सहकार्य केले.  भोई समाज क्रांती दलचे वर्धा जिल्हा सचिव पंकज बावणे यांनी तसेच संपूर्ण सहकारी कार्यकर्त्यांच्या वतीने ही रक्कम बुधवारी (ता. २१) त्यांच्या तेरवीच्या कार्यक्रमातच धनादेश देऊन भरीव आर्थिक मदत करुन कुटुंबाचे सांत्वन केले. याप्रसंगी पंकज बावणे, राजू  बावणे, दिलीप बावणे, बाबाराव बावणे, विनोद दाते, मनोहर हजारे, गणेश बावणे, संजय दाते, प्रकाश बावणे, आनंद दाते, कोमल दाते, लोमेश दाते या सर्व समाजसेवक व शहरवासीय उपस्थित होते. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: financial help to the family of dead person