esakal | अमरावतीत आणखी एक बालविवाह, वर-वधूच्या पालकांवर गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

file image
अमरावतीत आणखी एक बालविवाह, वर-वधूच्या पालकांवर गुन्हा दाखल
sakal_logo
By
संतोष तापकिरे

अमरावती : बालविवाह हा कायद्याने गुन्हा असल्याचे माहीत असतानाही अनेक ठिकाणी बालविवाह होत असल्याची माहिती परत एकदा समोर आली आहे. पिंपळखुटा अर्मळ येथे झालेल्या अशाच एका बालविवाहप्रकरणी पोलिसांनी नवरदेव व नवरीच्या पालकांवर गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा - आज 'ते' सेंटर असते तर वाचला असता कोरोना रुग्णांचा जीव

पिंपळखुटा अर्मळ येथे झालेल्या या बालविवाहात नवरीचे वय 17 वर्षे तीन महिने असल्याचे सूत्रांनी सांगितले. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या चाइल्डलाइनचे सदस्य अजय देशमुख यांना राष्ट्रीय टोल फ्री क्रमांकावर 12 एप्रिल रोजी रात्री 11.30 वाजता फोन आला. त्यात एका अल्पवयीन मुलीचा विवाह पिंपळखुटा अर्मळ येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली. या माहितीवरून अजय देशमुख व पंकज शिनगारे हे फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यातील क्राइम ब्रॅंचचे पोलिस निरीक्षक मगर, पोलिस उपनिरीक्षक जंगले, महिला पोलिस शिपाई तसेच आणखी एका पोलिसासह सकाळी 11 वाजता पिंपळखुटा अर्मळ येथे दाखल झाले. त्यावेळी मांडवात नववधू व वर बसले होते. एका तासापूर्वीच लग्न झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी लग्नाचे फोटो तसेच मांडवाचे फोटो काढले. या लग्नाला 30 ते 40 लोक होते. मुलीचे वय कमी असल्यावरही लग्न झाले व कोणीच ते रोखण्याचासुद्धा प्रयत्न केला नाही. त्यामुळे जिल्हा महिला बालविकास कार्यालयातील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डहले यांनी या घटनेची तक्रार पोलिस ठाण्यात दिल्यावर पोलिसांनी नववधू तसेच वराच्या पालकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.