आगीत मॉल, घराची राखरांगोळी : वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू

हिंगणघाट : मुथा यांच्या मॉलमधून उठत असलेले आगीचे लोळ.
हिंगणघाट : मुथा यांच्या मॉलमधून उठत असलेले आगीचे लोळ.

हिंगणघाट (जि. वर्धा) : येथील महावीर भवन चौकातील मुथा यांच्या दुमजली इमारतीला लागलेल्या आगीत त्यांच्या मालकीचे मिलन सुपर शॉप व निवासस्थान पूर्णपणे जळून भस्मसात झाले. या आगीत मुथा कुटुंबातील वृद्ध महिला शांताबाई मुथा (वय 80) यांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. 30) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर तब्बल पाच तासांनी आग विझविण्यात यश आले.
विजय मुथा यांच्या इमारतीच्या खालच्या मजल्यावर मिलन सुपर शॉप हा शहरातील सर्वांत मोठा किराणा मॉल होता. त्यावरच्या मजल्यावर त्यांचे निवासस्थान आहे. या निवासस्थानात मुथा परिवारातील दिनेश व विजय हे भावंडे आपल्या कुटुंबासह राहतात. दरम्यान, सोमवारी पहाटे मुथा कुटुंबीय साखर झोपेत असताना अचानक विजय मुथा यांच्या मुलाला गुदमरल्यासारखे झाल्याने तो झोपेतून उठला. पाहतो तर त्याला आगीचे लोळ सर्वत्र पसरत असल्याचे दिसले. त्याने लागलीच सर्वांना उठविले; परंतु विजय यांच्या कुटुंबाला घराच्या बाहेर पडण्यासाठी खालच्या मजल्यावर येऊन मिलन सुपर शॉपीतून बाहेर पडणे हा एकमेव मार्ग होता आणि हा मार्ग आगीने पूर्णपणे आपल्या कवेत घेतला होता. मुथा यांचा परिवार समोरच्या बाल्कनीत आला. तेथून ते शेडच्या टिनावरून उड्या घेत घराबाहेर पडले. दिनेशचे कुटुंब मागच्या दरवाजाने बाहेर पडले. घटनेच्या वेळी मुथा कुटुंबातील नऊ सदस्य घरात होते. या भावंडांच्या मातोश्री शांताबाई मुथा या वरच्या मजल्यावर समोरच्या खोलीत झोपलेल्या होत्या. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्या कोणतीही हालचाल करू शकत नव्हत्या. त्यांचा मुलगा विजय मुथा यांनी त्यांना रूममधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांत ते स्वतःही भाजले; परंतु त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. विजय यांनी घराबाहेर पडून मदतीकरिता फोन केले. परिसरातील युवक मदतीसाठी धावून आले. बालू रेडलावार, प्रदीप जोशी, संजय माडे, विजय ठुसे, नीलेश ठोंबरे आदींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. आगीचा भडका एवढा प्रचंड होता की, आग आणि धुरामुळे संपूर्ण इमारत वेढल्या गेली. हिंगणघाट अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. अग्निशमन दलाला नियंत्रण मिळविणे कठीण झाले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे, ठाणेदार सत्यवीर बंडीवार हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आमदार समीर कुणावार हेही तेथे आले. जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील अग्निशमन यंत्रणा सक्रिय झाली. पुलगाव, देवळी, वर्धा आणि नागपूर येथून अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीच्या एका बाजूला प्रकाश सिद्धमशेट्टीवार यांचे दुकान व घर असून, दुसऱ्या बाजूला कोहिनूर गेस्ट हाउस आहे. तसेच दुकानओळीही आहे. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्‍यात आली. तोपर्यंत श्री. मुथा यांचे मिलन सुपर शॉपी व निवासस्थान पूर्णपणे जळून राख झाली. बाजूलाच असणारे त्यांचे भाऊ संजय मुथा यांचेही दुकान आगीत राख झाले. आगीत श्री. मुथा कुटुंबांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन दलाने आग विझविल्यानंतर वरच्या मजल्यावरून श्री. मुथा यांच्या मातोश्री शांताबाई मुथा यांचे पार्थिव घराबाहेर काढले. दरम्यान, सकाळी 11.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अग्निशमन यंत्रणेजवळ उपकरणांचा अभाव
हिंगणघाट अग्निशमन दलाजवळ गाडी आहे; पण आग विझाविण्याकरिता लागणारी शिडी उपलब्ध नाही. मोठा पाइप फाटलेल्या अवस्थेत आहे. उपकरणांअभावी अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण जाते. अग्निशमन दलाची दुसरी गाडी बंद स्थितीत आहे. या घटनेनंतर उपकरणांच्या अभावांवरून संतप्त नागरिक रोष व्यक्त करीत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com