राजूर कॉलनी येथील सहा दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी...व्यावसायिकांचे मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

शॉर्ट सर्किटमुळे आग लागून राजूर कॉलनी येथील सहा दुकाने जळून खाक झाली. ही घटना शनिवारी (ता. 23) दुपारच्या सुमारास घडली. अखेर नागरिकांनी आग आटोक्‍यात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या आगीत व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

वणी (जि. यवतमाळ) : येथून सहा किमी अंतरावर असलेल्या राजूर कॉलनी येथे डीपीवरील शॉर्टसर्किटमुळे जवळ असलेल्या सहा दुकानांना आग लागली. ही घटना शनिवारी (ता. 23) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. या आगीत व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

राजूर बुद्धविहारसमोर असलेल्या जुन्या आठवडीबाजारातील वीज मंडळाच्या डीपीला शनिवारी (ता. 23) दुपारी तीन वाजताच्या दरम्यान झालेल्या शॉर्टसर्किटमुळे आग लागली.

आगीने केले रौद्ररूप धारण

या आगीत शेजारी असलेली दुकाने जळून खाक झाली. उन्हाळा व प्रचंड उष्णतामान असल्याने तीव्रपणे आगीने रौद्ररूप धारण केले होते; तर सहा दुकाने अवघ्या पाच मिनिटांत जाळून खाक झाली.

नागरिकांनी केली मदत

आग लागल्याबरोबर स्थानिक नागरिकांनी पाणी आणून टाकले. त्यानंतर आग आटोक्‍यात आली. परंतु तोपर्यंत सर्व दुकाने जळाली होती. घटनेची माहिती ताबडतोब अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन वाहन आल्यानंतर पुन्हा पाण्याच्या फवाऱ्याने आग पूर्णपणे विझविण्यात आली.

हेही वाचा : ऐकलं का? बारमधील मद्यसाठ्यात तफावत आढळल्यास कारवाई होणार म्हणे...

आगीवर मिळवले नियंत्रण

आगीची माहिती मिळताच गावातील पोलिस पाटील घटनास्थळी हजर झाले. त्यांनी सर्वप्रथम अग्निशमन विभागाला संपर्क केला व स्थानिक नागरिकांना पाणी टाकण्यास सांगून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढण्यास प्रतिबंध लागला. आग विझल्याने नागरिकांनी सुटकेचा श्‍वास सोडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fire at six shops in Rajur Colliery