बनावट कागदपत्रांव्दारे स्थापन केली बोगस फर्म, सख्ख्या भावंडांकडून फसवणूक

अनिल कांबळे
Tuesday, 15 September 2020

मुरखत यांचे मानकापूर मेन रोडवर तीन प्लॉट आहेत. त्यांनी त्या जागेवर न्यू कार्तिक नावाने फर्म सुरू केली होती. इकबाल आणि इराक हे दोघेही या फर्ममधून निवृत्त झाले होते. त्यानंतरही या भावंडांनी मुरखत यांची प्रॉपर्टी आणि फर्मचे दस्तावेजाचा गैरवापर करीत त्याच जागेवर पॅराडाईज सिनेमा नावाने दुसरी फर्म सुरू केली.

नागपूर : दोन भावंडांनी दस्तावेजाचा गैरवापर करून बनावट फर्म स्थापन केली. सरकारी कार्यालयांमध्ये कागदपत्रे दाखवून जमा प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बोरगाव पटेल नगर येथील मुरखत अहमद मुश्ताक अहमद (वय ६३) यांच्या फिर्यादीवरून मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये इकबाल अहमद मुश्ताक अहमद (रा. अनंतनगर) आणि इराक अहमद मुश्ताक अहमद (नर्मदा सोसायटी, योगेंद्रनगर) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरखत यांचे मानकापूर मेन रोडवर तीन प्लॉट आहेत. त्यांनी त्या जागेवर न्यू कार्तिक नावाने फर्म सुरू केली होती. इकबाल आणि इराक हे दोघेही या फर्ममधून निवृत्त झाले होते. त्यानंतरही या भावंडांनी मुरखत यांची प्रॉपर्टी आणि फर्मचे दस्तावेजाचा गैरवापर करीत त्याच जागेवर पॅराडाईज सिनेमा नावाने दुसरी फर्म सुरू केली. सर्व शासकीय कार्यालयात मुरखत यांच्या संपत्तीचे वस्तावेज लावले. 

क्लिक करा - "नागपूरच्या नावाने कानाला खडा"! माजी आयुक्त तुकाराम मुंढे म्हणतात पुन्हा कधी येणार नाही; वाचा त्यांची खास मुलाखत
 

त्यांच्या बनावट सह्या केल्या. मुरखत यांना माहिती मिळताच त्यांनी आरोपींना जाब विचारला. आरोपींनी त्यांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. मुरखतने सर्व शासकीय कार्यालयात तक्रार करीत माहिती मागितली. त्यात महाराष्ट्र फायर प्रिवेंशन आणि सिक्युरिटी अॅक्टचे उल्लंघन केल्याचे अग्निशमन विभागाने कळविले. मुरखत यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला
 

विहिरीत मृतदेह आढळला

लकडगंज ठाण्यांतर्गत लाकडीपूल हमालपुरा परिसरातील विहिरीत रविवारी दुपारी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. लकडगंज पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून मृतदेह बाहेर काढत उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. ३० ते ३५ वर्ष वयोगटातील मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
66 वाहन चालकांवर कारवाई

वाहतूक शाखा पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये विविध कलमांखाली एकूण ६६ वाहन चालकांवर कारवाई करून १८००० रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मुंबई दारूबंदी कायद्यान्वये ६ प्रकरणात ६ आरोपींना अटक करून ३,९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर जुगार कायद्यान्वये एका प्रकरणात ५ आरोपींना अटक करून २,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वरील सर्व मोहीम एकत्रितरित्या नागपूर शहर पोलिसांतर्फे राबविण्यात आली. या पुढेही कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येणार असून वाहनचालकांनी वाहन चालविताना वाहनासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावित असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे नागरिकांना करण्यात आले आहे.

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the firm set up by fictitious documents, cheated by siblings