अकोल्यात कोरोनाचा शिरकाव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

पाच किलो मीटर परिसरातील घरांचे होणार सर्व्हेक्षण ः उर्वरित अहवालांकडे नजरा

अकोला ः अकोला जिल्ह्यात पहिला पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (ता.7) दिली आहे. आढळलेला रुग्ण हा 60 वर्षांचा असून, शहरातील बैदपूरा येथील तो रहिवाशी आहे. दोन महिन्यांपूर्वी तो दिल्ली येथे गेल्याची माहिती आहे. मात्र अधिक माहिती देण्यास संबंधित रुग्णांकडून टाळाटाळ केली जात असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. ही अकोलेकारांसाठी धोक्याची घंटा असून, पहिला रुग्ण आढळल्याने अकोलेकर धास्तावले आहेत.

जगभरात कहर घालत असलेल्या कोरोना विषाणूचा अकोल्यात आतापर्यंत एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नव्हता. अशातच मागील दोन ते तीन दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचा संशय असलेल्यांच्या चाचणीचे अहवाल येण्यास विलंब होत आहे. त्यात सर्वोपचार रुग्णालयातर्फे पाठविण्यात आलेले 60 रुग्णांचे अहवाल प्रलंबित होते. मंगळवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या चाचणी अहवालात एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळला. या रुग्णांची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि तो याकाळात कुठे-कुठे वावरला याबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली जात आहे.

पाच किलो मीटर अंतरावरील घरांचे होणार सर्व्हेक्षण
पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी माहिती दिली की, या परिसरात हा रुग्ण आढळला त्या परिसरातील पाच किलो मीटर अंतरावरील सर्व घरांचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. यासाठी पोलिस विभाग, महानगरपालिका आणि रुग्णालय प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे.

तीन किमी परिघातील भाग ‘सिल’
पॉझीटीव्ह रुग्ण हा ज्या भागातील आहे त्या बैदपूरा या भागाला केंद्रबिंदू मानून तीन कि.मी. परिघातील परिसर तसेच दोन कि.मी.चा बफर झोन असा पाच किमी परिसर ‘सिल’ करून त्यातील तीन किमी परिसरात प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी करण्यात येईल. हा संपूर्ण भाग बंद ठेवण्यात येईल. बाहेरून कुणालाही या भागात प्रवेश दिला जाणार नाही, वा या भागातून कुणीही बाहेर जाऊ शकणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. यासंदर्भात स्वतंत्र आदेश जिल्हाप्रशासनाने निर्गमित केले. या भागाला सिलबंद राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त ही तैनात असेल, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त राखून या भागातील लोक बाहेर व बाहेरील लोक या भागात येणार नाहीत यासंदर्भात कलम १४४ नुसार संचारबंदीची अंमलबजावणी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पोलिसांना दिले आहेत.

‘पॉझिटीव्ह’ रुग्णाची पत्नी मात्र ‘निगेटीव्ह’
ज्या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्या रुग्णाची नजिकच्या काळातील कोणत्याही प्रवासाची नोंद नाही. या रुग्णासोबत त्याच्या पत्नीचेही नमुने पाठविण्यात आले होते. त्याच्या पत्नीचे अहवाल मात्र निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. या रुग्णाला तीन वर्षांपासून दम्याचा विकार असल्याची वैद्यकीय नोंद आहे असेही सूत्रांनी सांगितले.

अशी आहे आजची स्थिती
तपासणीसाठी पाठविलेले नमुने-123
प्राप्त अहवाल-86
पॉझीटिव्ह-1
निगेटीव्ह-85
प्रलंबित-37

प्रलंबित अहवालाकडे लक्ष
123 नमुन्यापैकी 86 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. मंगळवारी 86 अहवालापैकी एकजण पॉझिटीव्ह आढळल्याने खळबळ उडाली. अद्यापही 37 नमुने प्रलंबित असून, या उर्वरीत अहवालाकडे आता अकोलेकरांच्या नजरा लागल्या आहेत.

आता डॉक्टरांनाही धास्ती!
अकोल्यात पहिला कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढलल्यानंतर येथील सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही धास्ती भरली आहे. त्यामुळे डॉक्टरही विशेष खबर दारी घेत आहेत. विशेषत: विदेशातून आलेल्या किंवा इतर महानगरातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करताना त्यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

पॉझिटीव्ह रुग्णांचा व्यवसाय हार बनविण्याचा
परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या भागात हा पॉझिटीव्ह रुग्ण आढळला त्या भागात या रुग्णाचे हार बनविण्याचा व्यवसाय आहे. लग्न वा इतर समारंभात लागणारे पुष्पगुच्छ आणि हारांमध्ये चमकी लावण्याचा व्यवसाय करीत असल्याची माहिती. मागील नऊ महिन्यांपासून या पॉझिटीव्ह रुग्णांची कुठलीच ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. तेव्हा हा समुह संसर्गातील रुग्ण तर नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The first Corona positive in the city of Akola