अमरावतीत पहिला प्रयोग! कोरोनाविरुद्धच्या लढ्याला आता संघटित प्रयत्नांचे अधिष्ठान

hanuman
hanuman

अमरावती : कोरोना संक्रमणाची भयावह गती पाहता संपूर्ण समाजाचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. शासन आणि प्रशासनाच्या अथक परिश्रमाला यशस्वी करण्यासाठी आता समाजाच्या पुढाकाराची नितांत गरज आहे. त्यासाठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने घेतलेला पुढाकार कोरोना योद्घांना बळ देणारा ठरला आहे. हेल्पलाईनद्वारे शासन आणि प्रशासन यांच्या समन्वयातून समाजस्तरावर कोरोनामुक्त शहर चळवळीचा शुभारंभ करण्यात आला आहे.

मंगळवारी (ता.21) हव्याप्र मंडळात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत व पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये कोरोनामुक्त चळवळीला अंतिम स्वरूप देण्यात आले. यावेळी महापौर चेतन गावंडे, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, भाजप जिल्हाध्यक्ष किरण पातुरकर, गटनेता प्रशांत वानखडे, गटनेता बबलू शेखावत, गटनेता सुनील काळे, नगरसेवक विलास इंगोले, पोलिस उपायुक्त सातव व साळुंखे, माजी महापौर मिलिंद चिमोटे आदी मान्यवर उपस्थित होते.

जूनच्या अखेरपासून तर जुलै महिन्यात कोरोना संक्रमितांची वाढती संख्या पाहता नव्याने सक्षम अशा नियोजन व कृती आराखड्याची गरज भासत होती. त्या दृष्टिकोनातून हेल्पलाइनचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद कोरोनामुक्तीसाठी शहराला बळकटी देणारा ठरणार आहे. प्रत्येक प्रभागस्तरावर सर्व नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते, आरोग्य विभागाचे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांच्या समन्वयातून गठित करण्यात येणाऱ्या समितीद्वारे होणारे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, सर्वेक्षण आणि जनजागृतीद्वारे समाजाला कोरोनाच्या लढ्यात सहभागी करता येणार आहे. त्याकरिता पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हेल्पलाइनने घेतलेला पुढाकार यंत्रणेला बळ देणारा असल्याचे मत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केला.

सर्वांचा पुढाकार आवश्‍यक
कोरोनाचे वाढते थैमान पाहता आपल्या शहराला कोरोनामुक्त करण्याची जबाबदारी ही कोण्या एकाची नसून ती प्रत्येक व्यक्तीची आहे. शासन, प्रशासन दरदिवशी कोरोनाशी जिद्दीने व चिकाटीने लढत आहे. आता या परिश्रमाला सर्वसामान्यांच्या पुढाकाराची गरज आहे. सर्वांचा पुढाकार हाच कोरोनावर सक्षम उपाय असल्याचा विश्‍वास पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी व्यक्त केला.
संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com