घाबरले, उठले, सावरले आणि शिकले, हे समाधान वेगळेच

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : कोरोनाचा प्रवेश झाला आणि प्रत्येकाचे जीवनचक्रच बदलून गेले. सुरुवातीला अनेकांनी या विषाणूचा चांगलाच धसका घेतला होता. मात्र, हळूहळू त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्गही शोधले आणि त्यासोबतच राहायची मानसिकताही तयार करण्याची तयारी केली. या काळात अनेकांना संवेदना, मानवीय दृष्टिकोन, भावना अशा अनेक शब्दांचे जीवनातील अर्थ अनुभवांती कळले.

प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती कोरोनाचे संकट जाईल आणि पुन्हा रहाटगाडगे नेहमीप्रमाणे सुरू होईल, अशी अपेक्षा बाळगून आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांत कोरोनाने प्रत्येकाला काही तरी शिकविले. क्रीडाक्षेत्रही यास अपवाद नाही. नागपूरची असलेली आणि बॅडमिंटनमुळे व लग्नानंतर हैदराबाद येथे स्थायिक झालेली आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावणे हिचेही कोरोनाच्या काळातील अनुभव थरारक नसले तरी निश्‍चितच विचार करायला लावणारे आहेत. स्पर्धात्मक बॅडमिंटन कमी केल्यानंतर गेल्या एक वर्षापासून ती गोपीचंद अकादमीतच प्रशिक्षणाचे कार्य करीत आहे.

सुरुवातीला फार घाबरले होते. कारण, नवीन रोग आहे. आकडा वेगाने वाढत होता. विविध बातम्या येत होत्या. त्यामुळे उगीचच दडपण येत होते. त्यात लॉकडाउन लावण्यात आल्याने काही तरी भयानक आहे, असा समज झाला होता. त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेले बॅडमिंटन अचानक बंद झाले. त्यावेळी काहीतरी गमावल्याची भावना निर्माण झाली होती. सर्व काही विचित्र वाटत होते. एकूणच मानसिकता बदलली होती. त्यातून स्वतःला बाहेर काढणे गरजेचे होते. कारण, बॅडमिंटन बंद झाल्याने सुरुवातीला काही दिवस उशिरा उठणे, नुसता आराम करणे, टीव्ही पाहणे हे सर्व छान वाटत होते. मात्र, शरीराला व्यायामाची, बॅडमिंटनची सवय असल्याने काही दिवसांनंतर संकेत मिळू लागले. त्यामुळे मग घरीच योगा करणे, सूर्यनमस्कार करणे या सवयी लावून घेतल्या. एक सायकल मिळवली आणि घरासमोरच थोडीफार सायकलिंग करू लागले. त्यामुळे मानसिक दडपणातून बाहेर पडायला मदत झाली.

घरकाम करण्याचे समाधान वेगळेच
सराव, स्पर्धा, त्यानंतर प्रशिक्षण या धामधुमीत पूर्ण जोमाने घरकाम असे कधी केले नव्हते. लॉकडाउन लागल्यावर घरकाम करायला येणारे बंद झाले होते आणि वेळही भरपूर होता. त्यामुळे नियमित घरकाम करायला सुरुवात केली. बऱ्यापैकी स्वयंपाक करायला शिकली. विविध पदार्थ करून पाहिले. त्यामुळे घरकाम केल्यानेही व्यायाम होतो आणि एक वेगळेच समाधान मिळते, हा अनुभव आला. व्हर्चूअल मीटिंग, तंत्रज्ञान शिकले. या मीटिंगचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही अनुभवाला मिळायले. कारण, डोळे दुखणे, डोके दुखणे हा त्रासही अनुभवला. त्यातूनच व्लॉगची कल्पना प्रत्यक्षात उतरली. मी घरकाम करू शकते, व्हर्चूअल मीटिंग, झूमवर मुलाखत घेऊन व्लॉगवर टाकू शकते, याची प्रचिती आली. माझ्यात असलेल्या वेगळ्या गुणांची ताकद कळली किंवा ओळख कोरोनामुळे झाली असे म्हटले तर वावगे ठरू नये. मात्र, गेल्या चार महिन्यांच्या काळात बॅडमिंटनला खूप मिस केले, हे निश्‍चित.

...आणि पॅनिक झालो
अकादमीतील सराव थांबल्याने डोक्‍यात विचारांचे काहूर माजले होते. अकादमी कधी सुरू होणार, सराव सुरू झाल्यावर हॉल सॅनिटाइज करणार का?, प्रशिक्षकांना पीपीई किट घालावी लागेल का?, असे अनेक विचार येत होते. याच काळात कोरोना झाल्यानंतर रुग्णांना समाजाकडून, आप्तस्वकीयांकडून मिळालेली वागणूक याविषयी बातम्या येत होत्या. अशातच जवळच्या एका व्यक्तीला ताप आला. त्यावेळी आम्ही खूपच पॅनिक झालो होतो. कारण, कोरोना तर झाला नसेल ना, पुढे काय या विचारानेच मन चलबिचल झाले होते.

कोरोना नसता...
कोरोनामुळे जीवनाकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टिकोनात खूप बदल झाला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वेळेचा सदुपयोग कसा करावा हे शिकले. माझ्यात असलेल्या विविध गुणांचा मला उलगडा झाला. प्रशिक्षकांचे कार्य कुणी आजवर समोर आणले नव्हते. ते व्लॉग सुरू करून पुढे आणले. त्यातून मिळालेले समाधान अवर्णनीय आहे. नकारत्मतेतून कसे बाहेर पडावे हे कोरोनाने शिकविले. पण, कोरोना नसता तर ही एक्‍सायटमेंट नसती. माझ्यातील अनेक गुणांचा उलगडा झालाच नसता आणि वेळेचा सदुपयोग इतरांसाठी कसा करावा, हेसुद्धा शिकले नसते. त्यामुळे परिस्थिती आपल्याला काही तरी शिकवून जाते, असे म्हणतात ते येथे लागू पडते, असे म्हणायला हरकत नाही.

संपादन - नरेश शेळके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com