"त्या' नराधमांनी केले असे काही की गतिमंद मुलीचे झाले असे...वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 February 2020

एका गतिमंद मुलीवर तिच्या विकलांगतेचा फायदा घेत पाच नराधमांनी अत्याचार केला. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्‍यातील कुकडी येथे घडली. नराधमांच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिली. त्या पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

आरमोरी (जि. गडचिरोली) : गतिमंद व शारीरिक विकलांग असल्याचा गैरफायदा घेत एका युवतीवर वारंवार अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार आरमोरी तालुक्‍यातील कुकडी या गावात उघडकीस आला.

त्यामुळे पीडित युवती पाच महिन्यांची गर्भवती आहे. या प्रकरणी आरमोरी पोलिसांनी रविवारी (ता. 16) पाच नरधमांना अटक केली आहे.

पाच आरोपींना अटक

देविदास मनीराम कुमरे (वय 35, रा. कुकडी), दिगंबर विश्वनाथ दुर्गे (वय 52, रा. विहीरगाव), विजय गजानन कुमारे (वय 29, रा. कुकडी), सुधाकर तुळशीराम कुमोटी (वय 45, रा. कुकडी) व मेघश्‍याम नामदेव पेंदाम (वय 24, रा. वडधा, ता. आरमोरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

विविध गुन्हे दाखल

आरमोरी पोलिस ठाण्यात आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तक्रारकर्त्या महिलेची 19 वर्षाची पुतणी ही गतिमंद व मानसिक विकलांग आहे. याचा गैरफायदा घेत व तिच्यासोबत कोणी नसल्याची संधी साधून काही नराधमांनी तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन कधी शेतात तर कधी घरी अत्याचार केला.

पैसे अन्‌ चॉकलेटचे आमिष

या प्रकरणात पीडितेच्या गावातील 3 व बाहेरगावचे 2 अशा व्यक्तींचा समावेश आहे. या पाच जणांनी वेगवेगळ्या वेळेस गतिमंद युवतीला एकटे गाठून कधी पैसे तर कधी चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत माहिती कुठे दिली तर जिवानिशी ठार करू, अशी धमकीही दिली होती.

असे का घडले? : प्राध्यापक करायचा लैंगिक शोषण, पीडित विद्यार्थिनीने घेतला हा निर्णय

पीडित मुलगी 5 महिन्याची गर्भवती

पीडित गतिमंद मुलगी ही पाच महिन्यांची गरोदर राहिल्याने तिच्या घरच्यांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी पाच व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास आरमोरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज बोडसे व केतन चव्हाण करीत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five accused arrested for rape girl at gadchiroli