
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाउन असल्याने या विद्यार्थिनी गेल्या दोन महिन्यांपासून कझाकिस्तानातच आहेत. त्यांनी कसेबसे दोन महिने काढले, परंतु आता त्यांना जेवणासह इतर गैरसोयींनाही सामोरे जावे लागत आहे.
धामणगावरेल्वे (अमरावती) : वैद्यकीय शिक्षणासाठी कझाकिस्तानात गेलेल्या विदर्भातील पाच विद्यार्थिनी लॉकडाउनमुळे तेथेच अडकल्या असून आता त्यांना मायदेशी येणेही अवघड झाले आहे. धामणगावरेल्वे, मंगरूळ दस्तगीर, वर्धा व बुलडाणा येथील या विद्यार्थिनी आहेत.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाउन असल्याने या विद्यार्थिनी गेल्या दोन महिन्यांपासून कझाकिस्तानातच आहेत. त्यांनी कसेबसे दोन महिने काढले, परंतु आता त्यांना जेवणासह इतर गैरसोयींनाही सामोरे जावे लागत आहे. विदेशमंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी दूतावासाकडे प्रयत्न करून मायदेशी आणावे, अशी मागणी या विद्यार्थिनींसह त्यांच्या पालकांनी केली आहे.
अवश्य वाचा- वेळेवर धावून आला `परमेश्वर` म्हणून वाचला बापलेकीचा जीव
कझाकिस्तानच्या कारागंदा मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे धामणगाव, मंगरूळ दस्तगीर, वर्धा, बुलडाणा तसेच राज्यभरातील अनेक विद्यार्थी लॉकडाउनमुळे त्याच शहरात आहेत. तेथेसुद्धा लॉकडाउन घोषित केल्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी वसतिगृह आणि फ्लॅटमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये मणगाव येथील आदिती काळे, मंगरूळ दस्तगीर येथील किरण टेम्पे, बुलडाणा येथील मंजिरी महंत व वर्धा येथील रिया कांबळे, गुंजन बोकडे या विद्यार्थिनींचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थिनी कझाकिस्तानच्या कारागंदा मेडिकल युनिव्हार्सिटीमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. त्याच ठिकाणी थांबण्याची सूचना करण्यात आली असून या विद्यार्थिनींना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
अनेकदा त्यांचा पालकांशीही संपर्क होत नसल्याने चिंतेत भर पडली आहे. या विद्यार्थिनींच्या सुटकेसाठी लोकप्रतिनिधींसह शासनाने प्रयत्न करावे, त्यांना परत आणावे, अशी मागणी धामणगाव येथील आदिती काळे हिचे वडील डॉ. राजेश काळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. विदेशमंत्री व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली.
कझाकिस्तान येथून 23 मार्चला भारतात विमानाद्वारे येण्याचे तिकीट आदिती काळे या विद्यार्थिनीने काढले होते. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाल्यामुळे हे तिकीट रद्द झाले. गेल्या अडीच महिन्यांपासून प्रत्येक दिवस मोजून काढत असून त्यांना घरवापसीची आस आहे.