किटकनाशक फवारणीबाधित पाच रुग्ण गंभीर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

यवतमाळ : शेतातील पिकांवर किटकनाशक फवारताना विषबाधा झालेल्या पाच गंभीर रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. असे एकूण 14 फवारणीबाधित शेतकरी व शेतमजूर उपचारासाठी दाखल आहेत. गेल्या पंधरवड्यात सहा जणांवर उपचार करून वैद्यकीय महाविद्यालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
किडींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी किटकनाशकांच्या फवारणीचा जोर वाढला आहे. पिकांची वाढ होत असतानाच किडींपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी फवारणी करीत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून सुरक्षाकिट उपलब्ध करून दिल्याचा दावा करण्यात येत असला तरी शेतमजूर किटचा वापर करताना दिसत नाहीत.

ऑगस्ट महिन्याच्या 12 तारखेपासून फवारणीमुळे विषबाधा झालेले रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होणे सुरू झाले. आतापर्यंत एकूण 20 शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झाल्याची नोंद आहे. त्यापैकी सहा जणांना उपचाराअंती सुट्टी देण्यात आली. 14 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असून, डॉक्‍टरांच्या विशेष पथकाकडून उपचार करण्यात येत आहेत. खरीप हंगामात नेर तालुक्‍यात फवारणीने एका शेतकऱ्याचा बळी घेतला. दोन वर्षांपूर्वी किटकनाशकाच्या फवारणीने तब्बल 22 शेतकरी व शेतमजुरांचा बळी घेतला तर हजारो बाधित झालेत. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने केलेल्या जनजागृतीमुळे गेल्यावर्षी एकही मृत्यू झाला नाही. ऑगस्ट महिन्यात फवारणीच्या कामाला वेग येताच रुग्ण उपचारासाठी दाखल होऊ लागले आहेत.
घटनेची गंभीरता लक्षात घेता गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सीईओ जलज शर्मा यांनी रुग्णालयात भेट देऊन अधिष्ठाता डॉ. मनीष श्रीगिरीवार यांच्याकडून आढावा घेतला. अनेकदा व्यक्ती सलग दिवसभर काळजी न घेता फवारणी करतात. वाऱ्याची दिशा ओळखून फवारणी केली जात नाही. वारंवार प्रशासनाकडून सुरक्षाकिटचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत असले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी फवारणीमुळे विषबाधा होण्याचा धोका वाढतच चालला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five patients with pesticide spray serious

टॅग्स