पाच हजार कोटींची उलाढाल 

राजेश रामपूरकर - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

नागपूर - दिवाळीतील खरेदी महोत्सवाचा बाजारातील नूर आता ओसरला असून, विदर्भात या काळात जवळपास पाच हजार कोटींची उलाढाल झाली. गुरुपुष्यामृत ते भाऊबीज या मुहूर्तांवर सराफा पेढ्यांतून विक्रमी प्रमाणात सोने तर सतरा हजारांपेक्षा अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांची खरेदी झाली. 

नागपूर - दिवाळीतील खरेदी महोत्सवाचा बाजारातील नूर आता ओसरला असून, विदर्भात या काळात जवळपास पाच हजार कोटींची उलाढाल झाली. गुरुपुष्यामृत ते भाऊबीज या मुहूर्तांवर सराफा पेढ्यांतून विक्रमी प्रमाणात सोने तर सतरा हजारांपेक्षा अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांची खरेदी झाली. 

सोने, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू, वाहन विक्री, घरगुती उपयोगांच्या वस्तूंच्या खरेदीतूनच ही उलाढाल झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दिवाळीत बोनस आणि पगार एकत्र कर्मचाऱ्यांच्या हाती आला. त्यामुळे बाजारात सलग चार दिवस चैतन्य होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा बाजारात अधिक उलाढाल झाली. पिकांची स्थिती उत्तम असली तरी धान्य अद्याप बाजारात आले नाही. शेतकऱ्यांकडे पैसा पोहोचला नसला तरी यंदा बाजारात उत्साह होता. चिनी मालावरील बहिष्कारही दिसला. बहुतांश ग्राहकांनी पूजासामग्री अथवा दिवाळीच्या वस्तूंवर खर्च केला. यामुळे फुटपाथवरील लहान व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला झळाळी मिळाली. कपड्यांचा व्यापार चांगला झाला. मात्र, ब्रॅण्डेडशिवाय सुती व खादीच्या वस्तू पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात विकल्या गेल्या, असे अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी सांगितले. 

बॅंकेकडून कमी व्याजदरावर सहज कर्ज उपलब्ध झाल्याने चारचाकी आणि दुचाकीचा व्यवसाय चांगला झाला. यंदा विक्रमी वाहनविक्री झाल्याचे आर्या कार्सचे संचालक विशाल बरबटे यांनी सांगितले. भांडे, घरगुती उपयोगी वस्तूंच्या व्यापारात चांगली उलाढाल झाली. बॅंकांनी गृहकर्जाचे व्याजदर कमी केल्याने बांधकाम व्यवसायाला झळाळी मिळेल, असे वाटत होते. मात्र, बांधकाम क्षेत्राला या दिवाळीत "बूस्ट' मिळू शकला नाही, असे मत बांधकाम व्यावसायिक जयंत दळवी यांनी व्यक्त केले. 
 

सोन्यात गुंतवणूक वाढली 
सोन्याकडे गुंतवणूक पर्याय म्हणून पाहण्याचा लोकांचा कल वाढल्याचे या काळात दिसून आले. परंपरागत दागिन्यांसह बिस्किटांसारख्या चोख सोन्याचा पर्याय लोकांनी स्वीकारला. सोन्याबरोबरच डायमंडच्या दागिन्यांना चांगली मागणी होती. सोन्याचे पाणी चढविलेल्या दोन ग्रॅम आणि तीन ग्रॅमच्या दागिन्यांची मागणी वाढली. चांदीलाही ग्राहकांनी पसंती दिल्याचे रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five thousand crore turnover in diwali