

यवतमाळ - जिल्ह्यात बंजारा, आदिवासी व दलित समाजाच्या पाच कर्जबाजारी शेतकऱ्यांनी मागील ४८ तासांत आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गंभीर असल्याने संसदेच्या विशेष सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सरकारने दिलासा द्यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केली आहे.
शनिवारी (ता. १६ सप्टेंबर) यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी (ता. मारेगाव) येथील शेतकरी प्रवीण काळे यांनी, दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. १७) खडकी (ता. राळेगाव) येथील शेतकरी त्र्यंबक केराम व शिवणी (ता. घाटंजी) येथील शेतकरी मारोती चव्हाण यांनी; तर सोमवारी (ता. १८) अर्जुना (ता. यवतमाळ) येथील शेतकरी गजानन शिगणे आणि बाणगाव (ता. नेर) येथील शेतकरी तेवीचंद राठोड यांनी आत्महत्या केल्याची माहिती तिवारी यांनी दिली आहे.
यावर्षी २०२३मध्ये विदर्भात १,५८४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. शेतकरी आत्महत्यांना केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार असल्याचा आरोप किशोर तिवारी केला आहे. या वर्षात विदर्भाच्या ग्रामीण संकटामुळे १,५८४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. जो गेल्या २५ वर्षांतील हा विक्रमी आकडा आहे. लागवडीचा खर्च अतिशय वाढला आहे.
बँकांनी अपुरे पीककर्ज वाटप केल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. कोलमडलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत पॅकेजेस कोणताही दिलासा देत नाहीत. राजकीय नेतृत्वाचा अभाव व व्यवस्थेतील अनियंत्रित गैरव्यवहारामुळे विदर्भातील सर्वांत मागासलेला प्रदेश आहे, असे किशोर तिवारी यांनी गावांना भेटी दिल्यानंतर सांगितले.
पॅकेज जाहीर करा
विदर्भातील अत्यंत लहान प्रदेशात दररोज एकापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत. नजीकच्या भविष्यात पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा भारताचा दावा फोल ठरत आहे. संसदेच्या विशेष सत्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सरकारने चर्चा करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भाचा दौरा करून विशेष पॅकेज जाहीर करण्याचे आवाहनही किशोर तिवारी यांनी पंतप्रधानांना केले आहे.
रत्नापूर येथे शेतकऱ्यांने प्राशन केले कीटकनाशक
देवळी (जि. वर्धा) - देवळी तालुक्यातील रत्नापूर येथे तरुण शेतकरी दिनेश नानाजी मडावी (वय ३८) याने स्वतःच्या शेतामध्ये कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. १९) दुपारी घडली. घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दिनेश मडावी याच्याकडे वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. शेतीमध्ये कापूस पिकाची लागवड केली होती. पावसामुळे शेतीतील पीक उत्पन्न होण्यापासून वंचित राहणार या चिंतेने दिनेश हा नेहमी तणावात राहत होता. त्याच्यावर खासगी बँकेचे कर्ज आहे. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी गावात चर्चा आहे.
त्याच्या परिवारामध्ये पत्नी, लहान मुलगी, दोन भाऊ हे सर्व रोज मजुरी करणारे कुटुंब होता. दिनेश मडावी याला शासकीय मदत मिळावी अशी मागणी रत्नापूरचे सरपंच सुधीर बोबडे, उपसरपंच सौरव कडू तसेच गावातील इतर नागरिकांनी शासनाला विनंती केली आहे.
कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून युवकाची आत्महत्या
कारंजा - कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून एका २२ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही घटना १९ सप्टेंबरला सकाळी ८ वाजताच्या दरम्यान कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दिघी शिवारात उघडकीस आली. रक्षित चरण ढळे असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून तो दिघी येथील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार १९ सप्टेंबरला पहाटे ४ वाजता शेतात जातो असे सांगून रक्षित घरून निघून गेला. त्यानंतर सकाळी आठ वाजताच्या दरम्यान कुटुंबीय शेतात गेले असता शेतातील एका लिंबाच्या झाडाला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्यानुसार कुटुंबीयांनी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात आणला.
त्यानंतर दिघी येथे शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून घटनेचा अधिक तपास ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलिस करीत आहे. रक्षित हा कुटुंबातील एकमेव कमावता होता. त्यामुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून त्याने आत्महत्या केली अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.