घराणेशाहीचा झेंडा बुलंद 

file photo
file photo

अमरावती : कुणी पुत्र मोहापायी तर कुणी आपले वर्चस्व कायम राहावे, यासाठी घरातच उमेदवारी मिळवल्यात. कार्यकर्त्यांना डावलून घराणेशाही जपतात, असा आरोप करणारेही यातून सुटले नाहीत. विदर्भातील पश्‍चिम विभागात कुटुंबातच उमेदवारी मिळवून देण्याची बाब दिसून आली आहे. सर्वच पक्षांनी ही घराणेशाही विदर्भात जपली आहे. 
अमरावती जिल्ह्यातील आठपैकी निम्म्या म्हणजे चार मतदारसंघात घराणेशाही कायम आहे. मेळघाटात रिंगणातील तीनही उमेदवारांचा पूर्व-इतिहास घराण्यांचा आहे. पटेल, काळे व मावस्कर या घराण्यातील दुसरी-तिसरी पिढी या क्षेत्रात आली आहे. या तीन घराण्यांभोवती मेळघाटमधील राजकारण फिरत राहिल्याने नवीन नेतृत्व तयार झाले नाही. राष्ट्रवादीने या वेळी माजी आमदार तु. रू. काळे यांचे पुत्र केवलराम यांना, तर भाजपने माजी आमदार पटल्या गुरुजी यांचे पुत्र रमेश मावस्कर यांना उमेदवारी दिली. राजकुमार पटेल माजी आमदार दयाराम पटेल यांचे पुत्र असून दोनवेळा आमदार राहिले आहेत. केवलराम यापूर्वी एकवेळ, तर रमेश मावस्कर प्रथमच रिंगणात उतरले आहेत. 
तिवसा मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून आलेल्या कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर माजी आमदार भय्यासाहेब ठाकूर यांच्या कन्या आहेत, तर भाजपचे विधान परिषद सदस्य अरुण अडसड यांचे पुत्र प्रताप अडसड यांना धामणगावरेल्वे मतदारसंघात इतरांना दूर सारत उमेदवारी दिल्या गेली. या मतदारसंघात इच्छुकांची यादी मोठी होती. अरुण अडसड यांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. भाजपकडून त्यांना प्रत्येकवेळी उमेदवारी दिल्या गेली. या वेळी विधान परिषदेत स्थान दिल्या गेल्याने दुसऱ्याला संधी मिळेल, असे बोलल्या जात होते. 
बडनेरा मतदारसंघात शिवसेनेने माजी आमदार संजय बंड यांच्या सहचारिणी प्रीती बंड यांना उमेदवारी दिली आहे. सहानुभूतीचा आधार घेत त्या येथे उभ्या आहेत. 
पश्‍चिम विदर्भातील यवतमाळमधील पुसदमध्ये नाईक घराण्याभोवतीच राजकारण फिरते. नाईक घराण्यातील दोन उमेदवार वारसाने समोर आले आहेत. मनोहर नाईक यांचे पुत्र इंद्रनील राष्ट्रवादीकडून व अविनाश नाईकांचे पुत्र तथा विधान परिषद सदस्य नीलय नाईक भाजपकडून लढत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील माजी मंत्री स्व. पांडुरंग फुंडकर यांचे पुत्र आमदार आकाश फुंडकर यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. चिखलीमध्ये राहुल बोंद्रे, सिंदखेडराजातून डॉ. राजेंद्र शिंगणे यांची उमेदवारीही कुटुंबातूनच समोर आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com