esakal | गडचिरोली, अमरावती, वर्धा जिल्ह्यांत मुसळधार, शेकडो गावांना पुराचा वेढा
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

गडचिरोली, अमरावती, वर्धा जिल्ह्यांत मुसळधार, शेकडो गावांना पुराचा वेढा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गणपतीच्या आगमनासह पावसानेसुद्धा विदर्भात चांगलाच जोर पकडला आहे. सोमवारपासून (ता. 2) पावसाची सततधार सुरू असून नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे गडचिरोली, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांतील अनेक गावांना पुराने वेढली असून त्यांचा संपर्क तुटला आहे.
सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील चारशेपेक्षा अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. गडचिरोली शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना सकाळी घराबाहेरही पडता आले नाही. चामोर्शी व चंद्रपूर मार्गावर तीन ते चार फूट पाणी साचल्याने या महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. एटापल्ली तालुक्‍यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून 70 हून अधिक गावांना पाण्याने वेढले आहे. नगर परिषदेच्या आवारात तसेच विविध कक्षांमध्ये पाणी शिरल्याने बुधवारी आयोजित सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आली. भामरागडलगतच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली तसेच मुलचेराजवळील दिना नदीच्या पुरामुळे आष्टी मार्ग बंद होता.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात मंगळवारी (ता.3) रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असल्याने धारणी तालुक्‍यातील सर्व नदी-नाल्यांना पूर आला आहे. धुळघाट रोड गावातील सुरक्षाभिंतीला पाण्याने वेढलेले आहे. त्यामुळे प्रशासनाने गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. दिया व उतवली गावाजवळील सिपना नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे वैरागड रस्त्यावरील 30 गावांचा संपर्क तुटलेला आहे. राणीतंबोली येथेही सिपना नदी रौद्र रूप धारण करून वाहत आहे. यामुळे राणीतंबोलीजवळील गावांचा संपर्क तुटला आहे. रोहणीखेडा गावाजवळ सिपना नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने त्या मार्गावरील 30 गावांचा संपर्क तुटला आहे. गडगा व सिपना नद्यांवरील मुख्य पूल पाण्याखाली असल्याने सर्व नागरिकांनी सुरक्षितस्थळी थांबावे तसेच कोणतीही मदत हवी असल्यास तहसील कार्यालय धारणी येथे संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.
वर्धा जिल्ह्यात वर्धा, सेलू, कारंजा, आर्वी, हिंगणघाट, समुद्रपूर, खरांगणा आदी गावांमध्ये दुपारपासून पावसाने चांगलाच कहर केला. या पावसामुळे सेलू तालुक्‍यातील अनेक नदी-नाले ओसंडून वाहू लागले. यात खापरी नाल्याला पूर आल्याने पुरात खासगी बस अडकली. पुराचे पाणी गावातही शिरले. खापरी मुंगापूर येथील जिल्हा परिषद शाळेतही पाणी शिरले. वडगाव येथील नदीलाही पूर आला. यामुळे गावाचा संपर्क तुटला. दानापूर येथे नदीला आलेल्या पुरात गुणवंत घसाड (वय 48) वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

loading image
go to top