प्रकल्पांतील विसर्गामुळे भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

भंडारा : गेल्या रविवारपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. त्यात पुजारीटोला, संजय सरोवर, कालीसराड या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सतत सुरू असल्याने नदी, नाले, तलावांचा जलस्तर वाढला असून ग्रामीण भागात पूरसदृश स्थिती उद्‌भवत आहे. गेल्या चोवीस तासात पुराच्या पाण्यात चारजण बुडाले. घराची भिंत कोसळून एकजण ठार तर दोघे जखमी झाले.

भंडारा : गेल्या रविवारपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे. त्यात पुजारीटोला, संजय सरोवर, कालीसराड या प्रकल्पांतून पाण्याचा विसर्ग सतत सुरू असल्याने नदी, नाले, तलावांचा जलस्तर वाढला असून ग्रामीण भागात पूरसदृश स्थिती उद्‌भवत आहे. गेल्या चोवीस तासात पुराच्या पाण्यात चारजण बुडाले. घराची भिंत कोसळून एकजण ठार तर दोघे जखमी झाले.
सप्टेंबर महिन्यात पावसाने चांगलाच जोर पकडला. विशेषत: लाखांदूर, लाखनी व पवनी तालुक्‍याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पवनी तालुक्‍यात आजवर सर्वाधिक 1462 मि.मी. असा विक्रमी पाऊस पडला असून दोन वेळा अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. त्या पाठोपाठ लाखांदूर तालुक्‍यात 1275 मि.मी. तर लाखनी तालुक्‍यात 1295.5 मि.मी. सरासरी पाऊस झाला. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने मागील अनुशेष भरून काढला. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची सरासरी 97 टक्के आहे.
पुरामुळे झालेली वित्त व प्राणहानी
पाऊस पुरामुळे वित्त व प्राणहानीचा फटका बसला आहे. बुधवारी (ता.4) लाखांदूर तालुक्‍यात दहेगाव येथे नाल्याच्या पुरात आठ म्हशी वाहून गेल्या. शनिवारी (ता.7) खमारी/बु. येथील केशव मेश्राम हा शेतकरी शेतीचे काम आटोपून जात असताना सूर नदीच्या प्रवाहात वाहून गेला. तर पवनी तालुक्‍यात शनिवारी साडेचारच्या सुमारास भेंडाळा येथील डेव्हिड सोनटक्के हा आठ वर्षीय बालक खेळताना नाल्यात पडल्याने वाहून गेला. सिंदपुरी येथे घराची भिंत कोसळून मिलकराम नेवारे यांचा मृत्यू झाला. तर कुंदा नेवारे व निर्मला वगारे या दोघी जखमी झाल्या. मुसळधार पावसाने पवनी तालुक्‍यात 42 घरांचे अंशत: तर लाखांदूर तालुक्‍यात वीस घरांचे नुकसान झाले. जनावरे घेऊन जाणारी बोलेरो गाडी चांदोरी-सिंगोरी नाल्यावरील पुलावरून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. नाल्याला पूर असल्याने रस्ता बंद होता. रात्रीच्या वेळी चालकाला अंदाज न आल्याने त्याने गाडी थेट पाण्यात टाकली. नाल्यावर अंदाजे पाच फूट पाणी होते. जनावरे असलेली ही गाडी मध्यभागी जाऊन पुराच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेली. गाडीतील जनावरे दूरवर मृतावस्थेत आढळली. परंतु, चालक-वाहक बेपत्ता आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Floods in the Bhandara district due to project projects

टॅग्स