
अल्पवयीनचा जबरदस्तीने गर्भपात; खुंटीवर पिशवीमध्ये ठेवले अर्भक
पथ्रोट (जि. अमरावती) : गावालगत असलेल्या शेतातील झोपडीत सात महिन्यांच्या गर्भवतीचा अनैसर्गिक गर्भपात केल्याने अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे.
मध्य प्रदेशातील रहिवासी असलेली सात महिन्यांची गर्भवती असलेली अल्पवयीन मुलगी काही नातेवाइकांसह नजीकच्या शेतातील झोपडीत काम करण्याच्या उद्देशाने येऊन थांबले होते. या सर्वांनी शेतकऱ्याकडे सतत आठ दिवस कामही केले. परंतु, त्यांचा हेतू गर्भवती मुलीचा अवैध गर्भपात करण्याचा होता. यासाठी सुरुवातीला मुलीच्या आजीने आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याची मदत घेण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु, त्याने स्पष्ट नकार दिला.
सोमवारी (ता. नऊ) दुपारी शेतमालक शेतातून घरी गेल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी अनैसर्गिक गर्भपात करवून घेतला. परंतु, या प्रयत्नात मुलीची प्रकृती बिघडली. त्यामुळे जन्मलेल्या मृत अर्भकाला लपवून मुलीला अंजनगाव येथील ग्रामीण रुग्णालय नेले. तेथील डॉक्टरांनी तिला अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात रेफर केले. येथे डॉक्टरांच्या लक्षात हे प्रकरण आले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
पथ्रोट पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृत अर्भकाची शोधमोहीम सुरू केली. ते न सापडल्याने अमरावती येथून मुलीच्या आजीला पोलिसांनी बोलवून घेतले असता तिने झोपडीतील खुंटीवर पिशवीमध्ये ठेवलेले मृत पुरुष अर्भक पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणात सध्या तरी गुन्हा दाखल झाला नसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.