एका सिलिंडरसाठी चार तास रांगेत !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

कन्हान  (जि.नागपूर) : परिसरातील नागरिकांना गॅस सिलिंडर आणण्याकरिता पाऊस व चिखलात चार तास रांगेत उभे राहून सिलिंडर मिळत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्‍त होत आहे.

कन्हान  (जि.नागपूर) : परिसरातील नागरिकांना गॅस सिलिंडर आणण्याकरिता पाऊस व चिखलात चार तास रांगेत उभे राहून सिलिंडर मिळत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्‍त होत आहे.
केंद्र सरकारच्या वतीने धूरमुक्त, प्रदूषणमुक्‍त स्वयंपाकघर करण्याकरिता सर्व नागरिकांना गॅस सिलिंडरचा लाभ देण्यास सुरुवात करण्यात आली. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गोरगरिबांनासुद्धा सिलिंडर घेण्यास प्रवृत्त करण्यात आले. यामुळे गॅस सिलिंडरचे ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढले. त्या प्रमाणात सिलिंडर वितरणाच्या प्रणालीत वाढ न करण्यात आल्याने नागरिकांना सर्व कामधंदे सोडून धावपळ करून रांगेत लागावे लागते. सिलिंडरसाठी भयंकर त्रास सहन करावा लागतो. कन्हान शहर व परिसरातील 15 ते 20 गावांकरिता एचपी गॅस सिलिंडर वितरण केंद्र महामार्गालगत कन्हान गोदाम परिसरात आहे. येथेच शेतीच्या रासायनिक खतांचे गोदाम असून मालवाहू जडवाहनांची सतत ये-जा सुरू असते. परिसरात पावसामुळे चिखल साचलेला आहे. सकाळी 6 वाजतापासून नागरिकांना रांग लावून 10 वाजता सिलिंडरची गाडी आल्यावर नंबर लागल्यावरच सिलिंडर मिळत असल्याने भयंकर त्रास सहन करावा लागतो. यामुळे प्रशासनाच्या संबंधित विभागाने त्वरित लक्ष देऊन सिलिंडरच्या वितरण केंद्राची किंवा सिलिंडरची संख्या वाढवून सुरळीत व्यवस्था सुरू करावी. तसेच नागरिकांना घरपोच सिलिंडर मिळण्याची व्यवस्था झाल्यास नागरिकांच्या वेळेची बचत व होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळेल, अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four hours in a row for one cylinder!