esakal | बापरे! चौघांचा वणा नदीत बुडून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगणघाट :  नदीपात्रात मृतदेहाचा शोध घेताना पोलिस आणि नागरिक.

बापरे! चौघांचा वणा नदीत बुडून मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा) : गौरी विसर्जनासाठी वणा नदीच्या कवडघाट घाटावर गेलेल्या दोन महिला व दोन बालक, अशा चौघांचा बुडून मृत्यू झाला. या चौघांत एकाच परिवारातील तिघांचा समावेश आहे. ही घटना सोमवारी (ता. दोन) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
रिया रणजित भगत (वय 34) यांच्यासह त्यांची मुलगी अंजना (13) व मुलगा अभय (वय 10) या एकाच परिवारातील तीन सदस्यांचा आणि दीपाली मारोती भटे (वय 35) या चौघांचा मृतांत समावेश आहे. हे चौघेही शास्त्री वॉर्ड येथील रहिवासी आहे. या हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
शास्त्री वॉर्डात राहणाऱ्या रिया रणजित भगत, मुलगी अंजना, मुलगा अभय तसेच त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दीपाली भटे आणि परिसरातील आणखी काही महिला गौरी विसर्जनाकरिता कवडघाट शिवारातील रेल्वे पुलालगतच्या वणानदी घाटावर गेले होते. दरम्यान नदीपात्रात अभय भगत याचा पाय घसरून तो नदीत पडला. तो बुडत असल्याचे दिसताच त्याची बहीण अंजना त्याला वाचविण्यासाठी गेली. मात्र पाण्याला ओढ असल्याने तीही  बुडाली. या दोघांनाही वाचविण्यासाठी आई रिया भगत आणि दीपाली भटे या दोघे पुढे सरसावल्या. त्यांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. त्या दोघीही गटांगळ्या खाऊ लागल्या. यात बुडून चौघांचाही मृत्यू झाला.
या घटनेची माहिती आमदार समीर कुणावार यांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून मदतकार्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला आवश्‍यक सूचना दिल्या. घटनास्थळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, बाजार समिती सभापती ऍड. सुधीर कोठारी, माजी आमदार राजू तिमांडे यांनी भेट दिली.
पोलिसांची तत्परता
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाकडे जाताना राष्ट्रीय महामार्गावरील वणा नदी पुलाजवळ एक महिला वाहून जात असल्याचे दिसताच क्षणाचाही विलंब न करता पोलिस शिपाई रामदास चकोले यांनी नदीपात्रात उडी घेतली. यात त्यांनी या महिलेला बाहेर काढल्यानंतर त्या रिया भगत असल्याचे पुढे आले. त्यांना पोलिस शिपाई नितीन ताराचंदी यांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.

loading image
go to top