भीषण! विहिरीतील विषारी गॅसने पितापुत्रासह चौघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

विहिरीत विषारी वायू तयार झाल्याने या चौघांचे मृत्यू झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.
ही दुर्दैवी घटना रामपूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या कन्हारटोला येथे गुरुवारी ( ता. 2) सकाळी 9 च्या सुमारास घडली.

साखरीटोला (जि. गोंदिया) : घरी नवीन विहीर बांधली. तिचा वापर करण्यापूर्वी तिच्या पूजनाचा मुहूर्त निघाला. पूजनाची तयारी झाली. कार्यक्रमापूर्वी पंप सुरू करण्याचा प्रयत्न केला. सुरू झाला नाही. म्हणून एकजण विहिरीत उतरला. तो वर आला नाही म्हणून आणखी तीन खाली गेले. पण चौघांचेही प्रेतेच बाहेर आलीत. उद्‌घाटनाच्याच दिवशी या विहिरीने चार जणांचा बळी घेतला.

विहिरीत विषारी वायू तयार झाल्याने या चौघांचे मृत्यू झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.
ही दुर्दैवी घटना रामपूर ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या कन्हारटोला येथे गुरुवारी ( ता. 2) सकाळी 9 च्या सुमारास घडली. आत्माराम उरकुडा भांडारकर (वय 60) झनकलाल आत्माराम भांडारकर (26), राजू भैयालाल भांडारकर (35) व धनराज लक्ष्मण गायधने वय (50, सर्व रा. कन्हारटोला) अशी मृतांची नावे आहेत.

आत्माराम भांडारकर यांनी आपल्या अंगणात नवीन विहीर खोदली होती. विहीर वापरण्यास सुरू करण्यासाठी आज, गुरुवारी पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दरम्यान, काल बुधवारी ( ता. 1) रात्री विहिरीतील पाणी शुद्ध व्हावे म्हणून ब्लिचिंग पावडर, तुरटी, पिटकवरी याचे मिश्रण करून पाण्यात टाकले होते. गुरुवारी सकाळी विहिरीत पाणी काढण्यासाठी विद्युत पंप सुरू करायचा होता. त्यासाठी सकाळी 9 च्या सुमारास आत्माराम भांडारकर यांचा मुलगा झनकलाल हा फुटबॉल काढण्यासाठी विहिरीत उतरला. परंतु, त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला आणि तो तिथेच गुदमरून पडला.

सविस्तर वाचा - तुकाराम मुंढे यांनी या वादाविषयी केला मोठा खुलासा...

मुलगा कसेतरी करीत आहे हे पाहून त्याचे वडील आत्माराम हेसुद्धा विहिरीत उतरले. मात्र, तेही गुदमरून पडले. हा प्रकार एका मुलाने पाहिल्यानंतर शेजारच्यांना सांगितले. त्यामुळे शेजारी राजू भांडारकर व धनराज गायधने मदतीसाठी धावले. या दोघांनाही आत्मारामच्या पत्नीने एकाएकी उतरू नका असे सांगूनही हे दोघेही विहिरीत उतरले. त्यांचाही मृत्यू झाला. सोबत शेजारी असलेला राधेशाम हाही विहिरीत उतरत होता. पण अर्ध्या विहिरीत उतरल्यानंतर धोका लक्षात आल्याने राधेशाम परत वर चढला. परिणामी त्याचा जीव वाचला. पुढील तपास सालेकसा पोलिस करीत आहेत.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four persons died due to toxic gas in well