विदर्भात गणेश विसर्जनादरम्यान चौघांचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

नागपूर : विदर्भात गणेश विसर्जनादरम्यान चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अमरावती, वर्धा व भंडारा जिल्ह्यात घडली. यात पूर्णा नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले; तर दोघे बेपत्ता आहेत. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्‍यातील जुनापाणी येथे विहिरीत बुडून युवकाचा मृत्यू झाला. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्‍यात नाल्यात गणेश विसर्जनास गेलेला युवक वाहून गेला. नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्‍यात गोठणगाव येथे गुरुवारी (ता. 12) मरू नदीपात्रात गणेश विसर्जनाला गेलेल्या गुलाब श्‍यामराव डंभारे (वय 53, रा. गोठणगाव) यांचा बुडून मृत्यू झाला.

वाठोडा शुक्‍लेश्वर (जि. अमरावती) : भातकुली तालुक्‍यात गावातील सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन करीत असताना गुरुवारी (ता. 12) पूर्णा नदीपात्रात वाठोडा शुक्‍लेश्वर गावात अनंत चतुर्दशीच्या दिवशी चौघे जण बुडाले. त्यापैकी 16 तासांनंतर शुक्रवारी (ता. 13) दोघांचे मृतदेह सापडले. दोघे अद्याप बेपत्ताच आहेत. संतोष बारीकराव वानखडे (वय 40) व सागर अरुण शेंदूरकर असे मृत व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी सांगितले. ऋषिकेश बाबूराव वानखडे, सतीश अजाबराव सोळंके हे अद्याप बेपत्ता आहेत. नदीपात्रात शुक्रवारी (ता. 13) सायंकाळपर्यंत शोध व बचाव पथकाचे काम सुरू होते. गुरुवारी अनंत चतुर्दशीला सायंकाळी वाठोडा शुक्‍लेश्वर येथील चार जण गणेशमूर्ती विसर्जनाकरिता पूर्णा नदीपात्रात गेले होते. गुरुवारी सायंकाळी आधी दोघे जण विसर्जनासाठी पाण्यात उतरले. ते दोघे गटांगळ्या खात असल्याचे बघून तिसऱ्याने पुन्हा पाण्यात उडी घेतली. मात्र त्या तिघांना पोहता येत नव्हते. पोहता येत असलेल्या व्यक्तीने त्यांना वाचविण्याकरिता खोल पाण्यात उडी घेतली; परंतु चौघेही बुडाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शोध व बचाव पथकाला येथे पाचारण करण्यात आले. बचाव पथकानेसुद्धा रात्री उशिरापर्यंत बेपत्ता व्यक्तीचा शोध घेतला. शुक्रवारी (ता. 13) पुन्हा सकाळपासून शोध व बचाव पथकाचे काम येथे सुरू होते. अकराच्या सुमारास, संतोष वानखडे यांचा मृतदेह पाण्यात आढळल्यावर उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. दुपारी साडेतीनच्या सुमारास सागर शेंदुरकरचा मृतदेह आढळला.
कारंजा (घा) (जि.वर्धा)  तालुक्‍यातील जुनापाणी येथे गुरुवारी (ता. 12) दुपारी गणपती विसर्जनाला गेलेल्या युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. गुणवंत यादव गाखरे (वय 20) रा. जुनापाणी असे मृताचे नाव आहे. गावातील चिरकुट धंडाळे यांच्या शेतातील विहिरीत चार ते पाच गणपती विसर्जनाला नेण्यात आले. काही वेळाने गुणवंत हा विहिरीत बुडाला. विहिरीत लोखंडी गळ टाकल्यानंतर गुणवंताचा मृतदेह आढळून आला.
लाखांदूर (जि. भंडारा) : तालुक्‍यातील ढोलसर-मासळ मार्गावरील नाल्यात गुरुवारी सकाळी गणेश विसर्जनास गेलेला युवक वाहून गेला. सोमेश्‍वर देवराम शिवणकर (वय 38) असे वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे. ढोलसर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाद्वारे गुरुवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी गावातील युवकांसोबत सोमेश्‍वरही गेला. नाल्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. बचाव व शोध पथकाद्वारे शोध सुरू आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four persons drowned during Ganesh visarjan in Vidarbha