अकोला जिल्ह्यातील चार प्रमुख पक्षांना नव्या धुरकऱ्यांची प्रतीक्षा

मनोज भिवगडे 
Monday, 10 February 2020

भाजप, ‘वंचित’, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये पक्ष संघटनात्मक बदलाचे वारे

अकोला : विधानसभा व जिल्हा परिषदेची निवडणूक आटोपल्यानंतर आता जिल्ह्यातील चार प्रमुख पक्षांमध्ये संघटनात्मक बदलाचे वारे वाहू लागले आहेत. येत्या काही दिवसात भाजप, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि शिवसेनेला नवे धुरकरी मिळणार आहेत. त्यापैकी भाजपच्या संघटनात्मक बदलाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. काँग्रेसचे पदाधिकारी लवकर बदलणार असून, ‘वंचित’ची नवी कार्यकारिणी मार्च महिन्यात जाहीर होईल. शिवसेनाही नव्या जिल्हा प्रमुखाच्या शोधात आहे.

 

भाजप महानगर, जिल्हाध्यक्ष निवड बुधवारी
भाजप महानगर व व ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक बुधवार, 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक अधिकारी आमदार गिरीश व्यास व केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.  महानगराध्यक्षपदासाठी माजी महापौर विजय अग्रवाल यांचे नाव चर्चेत आहे. अग्रवाल यांच्याकडे महानगराध्यक्षपद सोपविण्यात आले नाही तर किशोर मांगटे पाटील यांच्याकडे जबाबदारी कायम ठेवल्या जाण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्याकडे सोपविले जाण्याची शक्यता आहे. मात्र आमदार म्हणून त्यांच्याकडे असलेला कामाचा व्याप बघता त्यांच्या निकटवर्तीयाला जबाबदारी दिली जाऊ शकते. यात अमित कावरे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे.

 

‘वंचित’ जिल्हाध्यपदासाठी स्पर्धा
भारिप-बमसंचे विलनीकरण वंचित बहुजन आघाडीत झाले. त्यामुळे दोन्ही संघटनांच्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्या आहेत. आता नवीन कार्यकारिणी निवडली जाणार आहे. त्यासाठी चाचपणी केली जात आहे. येत्या महिनाभरात कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाण्याची शक्यता असून, मार्चमध्ये आयोजित दिल्लीतील मोर्चानंतर नवे पदाधिकारी जाहीर होईल. ‘वंचित’च्या जिल्हाध्यक्षपदासाठी डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, बालमुकुंद भिरड यांची नावे चर्चेत आहेत.

 

काँग्रेसच्या संघटनात्मक बदलात तरूणाला संधी
काँग्रेसच्या जिलह्यातील संघटनात्मक बदलाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. काँग्रेसला जिल्ह्यात नवीन धुरकरी आता लवकरच मिळणार आहे. महिनाभरात नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करून नावे जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या संघटनात्मक बदलामध्ये तरूण पदाधिकाऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी प्रकाश तायडे, हेमंत देशमुख, महेश गणगणे, डॉ. अभय पाटील, प्रशांत गावंडे यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय विद्यमान कार्याध्यक्ष सुनील धाबेकर यांनाही जिल्हाध्यक्षपदी बढती मिळू शकते. महानगराध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष बबनराव चौधरी यांना पुन्हा एक संधी मिळून ते पदावर कायम राहण्याची शक्यताच अधिक आहे. याशिवाय कपिल रावदेव, नितीन ताकवाले, रमाकांत खेतान, अविनाश देशमुख यांचीही नावे महानगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

 

शिवसेनेत जिल्हा प्रमुखपदासाठी रस्सीखेच
शिवसेनेत जिल्ह्यामध्ये सध्या दोन आमदारांमध्ये पक्षातील वर्चस्वाची लढाई सुरू आहे. विधान परिषदेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि बाळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले नितीन देशमुख या दोघांमध्ये सध्या पक्ष विभागला आहे. अकोला शहरातील संघटनेवर आ. बाजोरिया यांची पकड आहे तर ग्रामीणमध्ये नितीन देशमुख यांनी संघटना बांधली आहे. त्यांच्याच नेतृत्वात शिवसेनेचे जिल्हा परिषदेत 13 सदस्य निवडून आलेत. ते जिल्हाप्रमुख असतानाच आमदार झाले. त्यामुळे त्यांच्या जागेवर आता जिल्हाप्रमुखपदी दुसऱ्या संधी दिली जाणार आहे. त्यासाठी शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते व निवासी उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांचे नाव आघाडीवर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four political party new head elected soon