esakal | ग्रामपंचायतीकडून मोफत दळण
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

ग्रामपंचायतीकडून मोफत दळण

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांच्या मागे तगादा लावण्याचा प्रघात मागील अनेक वर्षांपासून ग्रामपंचायतींकडून सुरू असतो, मात्र शेंदोळा खुर्द ग्रामपंचायतीने एक पाउल पुढे टाकत कराचा भरणा नियमित करणाऱ्या ग्रामस्थांना मोफत दळणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीने स्वत: पीठगिरणीसुद्धा सुरू केली आहे. हा विदर्भातील पहिलाच प्रयोग आहे.
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्‍यातील शेंदोळा खुर्द हे गाव दत्तक घेण्यात आले आहे. सध्या मिशन असोसिएट असलेले विजयसिंह राजपूत यांच्या कार्यकाळात या गावात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यांची पदोन्नती झाल्यानंतर पूजा खडसे यांच्याकडे ग्राम परिवर्तक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. ग्रामपंचायतींना कर वसुलीचा प्रश्‍न भेडसावत असतो. त्यावर उपाय म्हणून तत्कालीन ग्राम परिवर्तक विजयसिंह राजपूत, विद्यमान ग्राम परिवर्तक पूजा खडसे तसेच सरपंच शरद वानखडे यांनी मोफत दळणाची संकल्पना आखली आणि ती प्रत्यक्षातसुद्धा उतरविली. चालू आर्थिक वर्षांतील संपूर्ण कराचा भरणा करणाऱ्या कुटुंबाला 25 ते 30 किलो धान्य ग्रामपंचायतीकडून मोफत दळून मिळणार आहे. या मोफत पीठगिरणीचे उद्‌घाटन माजी कृषी आयुक्त तथा ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यसंचालक उमाकांत दांगट यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी सरपंच शरद वानखडे, उपसरपंच प्रतिभा यावले, युवराज सासवडे, ग्राम परिवर्तक पूजा खडसे, विजयसिंह राजपूत, प्रवीण लिखानकर, निखीलेश यादव, शैलेश नाठे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच शरद वानखडे, उपसरपंच प्रतिभा यावले, तंटामक्ती अध्यक्ष गुणवंत उमक, पोलिस पाटील दिनेश इंगोले, पूजा खडसे आदींचे सहकार्य लाभले.

विशेष म्हणजे केवळ दळणच नव्हे तर शेंदोळा ग्रामपंचायतीने यापूर्वी गावकऱ्यांसाठी शुुद्ध मोफत पाणीपुरवठा योजनासुद्धा सुरू केली आहे. या माध्यमातून कराची वसुली होत असताना ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातसुद्धा वाढ होणार आहे. त्यातून विकासकामांना चालना मिळेल.
शरद वानखडे, सरपंच (शेंदोळा खुर्द)  

loading image
go to top