Friendship Day Special : मैत्रीतून दृढ झाले रक्ताचे नाते

मनीषा मोहोड-येरखेडे
रविवार, 4 ऑगस्ट 2019

तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय सेवा योजनेच्या नोएडा येथे झालेल्या राज्यस्तरीय शिबिरात विदर्भातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची भेट झाली. शिबिरातून निर्माण झालेले मैत्रीचे बंध रक्तदानाच्या माध्यमातून रक्ताच्या नात्यापर्यंत दृढ झाले. मैत्रीदिनाच्या पार्श्‍वभूमीवर विदर्भातील जुनून ग्रुपच्या सदस्यांनी रक्तदानाचा प्रचार, प्रसार राज्यभरात करण्याचा संकल्प केला आहे.

नागपूर - तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय सेवा योजनेच्या नोएडा येथे झालेल्या राज्यस्तरीय शिबिरात विदर्भातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची भेट झाली. शिबिरातून निर्माण झालेले मैत्रीचे बंध रक्तदानाच्या माध्यमातून रक्ताच्या नात्यापर्यंत दृढ झाले. मैत्रीदिनाच्या पार्श्‍वभूमीवर विदर्भातील जुनून ग्रुपच्या सदस्यांनी रक्तदानाचा प्रचार, प्रसार राज्यभरात करण्याचा संकल्प केला आहे.

विदर्भातील 25 ते 30 तरुण-तरुणी शिबिराच्या माध्यमातून एकत्र आले. मैत्री झाली. त्यानंतर एका विद्यार्थ्याच्या नातेवाइकाला रक्ताची आवश्‍यकता असल्याने त्याने आपल्या ग्रुपमधील मित्रांकडे मदत मागतिली. तिथूनच या ग्रुपने रक्तदानासाठी कार्य सुरू केले. कुणालाही रक्ताची आवश्‍यकता असली की, जुनून ग्रुपमधील सदस्यांना मदत मागायची. रात्री, बेरात्री कुठूनही केव्हाही हे सदस्य रक्ताची तूट पूर्ण करतात, अशी प्रसिद्धीच या ग्रुपने गेल्या तीन वर्षात मिळवली आहे. ग्रुपमधील सदस्य नागपूरसह, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ येथेही रक्तदानाची सेवा करतात. दर तीन महिन्यातून, रक्तदान शिबिर घेऊन, सर्व सदस्य एकत्रित येतात. याशिवाय रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, शासकीय दवाखान्यातील, रुग्णांना आवश्‍यक मदत करणे तसेच ग्रुपमधील सदस्यांला कुठलीही अडचण आली तरी, त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन, मदतीची साखळी तयार करण्याचे काम जुनून ग्रुपमधील तरुण करत आहेत.

ग्रुपमध्ये सौरभ उराडे, गोविंद देशमुख, सचिन सूर्यवंशी, नीलेश साखरकर, योगिनी ठाकरे, शुभांगी देवीकर, शीतल साखरकर, राधा महाजन, विनोद हजारे, श्रद्धा पांडे, हर्ष मोहाडीकर, मयूरी आत्राम, ज्ञानवंती शेंडे, शुभम ढगे, सूरज अग्रवाल, प्रसाद फुलबांधे, पूजा पोहणे, मनीष खडपे, गौरव कोडंकर अशी एक एक नावे जुळत असून, समाजसेवेची आवड असलेल्या प्रत्येक तरुणाचे या ग्रुपमध्ये स्वागत करण्यात येते. जुनुन ग्रुपच्या सदस्यांनी आपआपल्या संपर्कातील, तरुणांचे स्वतंत्र व्हॉट्‌सऍप ग्रुप बनविले. फेसबुक पेजवरही रक्तदान साखळी प्रसिद्ध केली. या माध्यमातून दरमहा ग्रुपमधील सदस्य, 25 ते 30 गरजूंना रक्तदान करत आहेत. याबरोबर जुनून ग्रुपच्या सदस्यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांना पेपरप्लेट तयार करण्याचा रोजगार मिळवून देत, त्यांच्या कार्याची मार्केटिंग आणि मालाची विक्री करण्यासही पुढाकार घेतला. पुढील महिन्यात वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी लिहिलेल्या डायरीचे पुस्तक रूपात प्रकाशन करण्याचा जुनून ग्रुपचा मानस आहे. मैत्रीदिनानिमित्त वृद्धांना दिलेली ही भेट असल्याचे जुनूनच्या सदस्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Friendship Day Special Relation