हिंगणघाटच्या "त्या' दुर्दैवी घटनेतील मृत अंकितावर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 February 2020

अंकिताच्या मृत्यूची बातमी कळताच हिंगणघाट, समुद्रपूरसह सभोवतालच्या गावांतील हजारो नागरिकांनी दारोडा गावाकडे धाव घेतली. अंकिताला अखेरचा निरोप देताना हजारोंना अश्रू अनावर झाले.

हिंगणघाट (जि. वर्धा) : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे आरोपीने पेट्रोल टाकून जाळलेल्या घटनेतील पीडित अंकिता अरुणराव पिसुड्डे या तरुणीचा सोमवारी (ता.10) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. तिच्या मृतदेहावर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दारोडा या गावी अतिशय शोकमग्न वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्तही चोख होता. 

मृत्यू बातमी ऐकताच हजारो नागरिकांची दारोडा गावाकडे धाव

अंकिताच्या मृत्यूची बातमी कळताच हिंगणघाट, समुद्रपूरसह सभोवतालच्या गावांतील हजारो नागरिकांनी दारोडा गावाकडे धाव घेतली. अंकिताला अखेरचा निरोप देताना हजारोंना अश्रू अनावर झाले. नागरिकांच्या शोकसंतप्त भावना उचंबळून आल्या. दरम्यान, तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नागपूर येथील खासगी रुग्णालयात शवविच्छेदन आटोपून दुपारी एक वाजताच्या सुमारास अंकिताचा मृतदेह दारोडा गावात आणण्यात आला. यावेळी नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा झाल्याशिवाय गावात मृतदेह आणू नका, असे म्हणत रस्ता रोखला. शिवाय त्यांना पांगविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर नागरिकांनी गोटमारही केली. पण, पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये झालेल्या चर्चेअंती मृतदेह तिच्या घरी नेण्यात आला. यावेळी राजकीय नेत्यांसह मोठ्या प्रमाणात शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

उपस्थितांना अश्रू झाले अनावर

नागरिकांच्या संतप्त भावना पाहता अंकितावर लवकरात लवकर अंत्यसंस्कार करण्यात यावे, असे पोलिस आणि प्रशासनाचे प्रयत्न होते. पण, तिचा लहान भाऊ प्रज्वल पिसुड्डे हा बाहेरगावी असल्याने अंत्यसंस्कारासाठी विलंब झाला. तो आल्यानंतर अंत्ययात्रा निघाली. अंकिताचे वडील अरुण पिसुड्डे यांनी चितेला मुखाग्नी दिला. याप्रसंगी उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. 

 

अवश्‍य वाचा- भावनांचा उद्रेक; नेते, प्रतिनिधींवर महिला भडकल्या, रुग्णवाहिकेवर दगडफेक 

 

मान्यवरांसह अनेकांची उपस्थिती

यावेळी खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, जिल्हा परिषदेचे सभापती माधव चंदनखेडे, हिंगणघाटचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, पोलिस अधीक्षक बसवराज तेली, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे, तहसीलदार श्रीराम मुंधडा, किशोर दिघे, शिवसेनेचे तुषार देवढे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह अनेकांची उपस्थिती होती. 

भाऊ जळगावला असल्याने अंत्यसंस्कारास विलंब

अंकिताचा भाऊ प्रज्वल पिसुड्डे हा जळगाव येथील महाविद्यालयात बी.टेक. द्वितीय सेमिस्टरला आहे. बहिणीवर झालेल्या जिवघेण्या हल्ल्यानंतर तो गावी परत आला होता. त्याची परीक्षा असल्याने तो नुकताच जळगावला गेला होता. त्याला अंकिताच्या मृत्यूची बातमी मिळताच तो सकाळी तेथून निघाला आणि सायंकाळी चार वाजताच्या सुमारास वर्ध्यात आला. तो गावाला गेल्यानंतरच अंत्ययात्रा निघाली. 

खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्याची मागणी

मृत तरुणीची अंत्ययात्रा गावातून निघाली असताना संतप्त गावकरी घोषणा देऊन आरोपीला फाशी द्या, अशी मागणी करीत होते. मध्येत गावकऱ्यांनी अंत्ययात्रा थांबवून या जळीत प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. 

घटनाक्रम असा...

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या नंदोरी चौक परिसरात दारोडा येथील 30 वर्षीय प्राध्यापिका तरुणीच्या अंगावर माथेफिरू विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले व तो तेथून पसार झाला होता. यामध्ये ती 30 टक्के भाजली होती. आरोपीला चार तासांच्या आत पोलिसांनी बुटीबोरीजवळील टाकळघाट एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले होते. घटनेनंतर लगेच पीडित प्राध्यापिकेला नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोपी विकेश नगराळे हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे. 

पीडित युवती हिंगणघाट येथील मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र या विषयाची प्राध्यापिका होती. 30 वर्षीय प्राध्यापिका दररोज सकाळी कॉलेजला जाताना आरोपी विकेश नगराळे तिचा पाठलाग करायचा. सोमवारी तीन फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे ती दारोडा या आपल्या गावातून हिंगणघाटला बसने आली. त्यानंतर नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना आरोपी नगराळे पाठीमागून दुचाकीवर आला. त्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. स्वतःच्या गाडीतील पेट्रोल काढले. त्याने सोबत कपडा गुंडाळलेला टेंभा आणला होता. त्याने युवतीच्या पाठीमागे जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले व पेटवलेला टेंभा तिच्या अंगावर फेकून तेथून पळ काढला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Funeral on the dead Ankita in Hinganghat burning incident