Gadchiroli Chimur Lok Sabha : गडचिरोलीत नेतेंची हॅटट्रिक की डॉ. किरसान यांना पहिल्यांदा संधी!

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे मतांचे दान यंदा महाविकास इंडिया आघाडीचे डॉ. नामदेव किरसान यांना मिळणार, की महायुतीचे अशोक नेते यांच्या पदरात पडणार याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.
ashok nete and dr. namdeo kirsan
ashok nete and dr. namdeo kirsansakal

गडचिरोली - २००९ मध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव झालेला गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे मतांचे दान यंदा महाविकास इंडिया आघाडीचे डॉ. नामदेव किरसान यांना मिळणार, की महायुतीचे अशोक नेते यांच्या पदरात पडणार याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. सलग दोनदा खासदार म्हणून निवडून आलेले अशोक नेते तिसरा विजय प्राप्त करत हॅटट्रिक करतील की अद्याप आमदारही न झालेले डॉ. नामदेव किरसान खासदार होतील, यावर पैजा लावल्या जात आहेत.

पूर्वी खुल्या असलेल्या या मतदारसंघाचे रूपांतर अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांकडे उमेदवारीचे मर्यादित पर्याय शिल्लक राहिले. २००९ मध्ये कॉंग्रेसचे मारोतराव कोवासे यांनी अशोक नेते यांचा पराभव करून विजय प्राप्त केला होता.

पण पुढच्या २०१४ व २०१९ या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसने माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी नावाचा कमजोर उमेदवार दिल्याने या दोन्ही निवडणुका अशोक नेते यांनी सहज जिंकल्या आणि सलग दोनदा खासदार झाले. गंमत म्हणजे अशोक नेते यांच्याकडून दोनदा सपाटून मार खाणारे डॉ. उसेंडी यंदाच्या २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा त्याग करून भाजपवासी होत नेते यांचाच प्रचार करत होते.

काँग्रेसच्या एका नामदेवाला दोनदा चारी मुंड्या चित करून अशोक नेते यांनी त्यांना आपल्या भाजप पक्षातसुद्धा आणण्याची किमया केली. पण त्यांच्या विरोधात यंदा काँग्रेसचे आणखी एक नामदेवच उभे ठाकले आहे. हे नवे डॉ. नामदेव किरसान अतिशय परिश्रमी असून त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.

शिवाय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही जोरदार प्रचार केला. सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या या लोकसभा क्षेत्रात पूर्वी काँग्रेसचाच वरचष्मा होता. पण काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत सलग दोन टर्म हे क्षेत्र भाजपने आपल्याकडे ठेवले.

एक देवदर्शनात, दुसरे आभार मानण्यात व्यस्त

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात १० उमेदवार असले, तरी महायुतीचे अशोक नेते आणि महाविकास आघाडीचे डॉ. नामदेव किरसान यांच्यातच खरी लढत आहे. निवडणुकीनंतर अशोक नेते देवदर्शनात व्यस्त झाले. मतदान आटोपल्यावर ते शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनाला गेले होते.

नुकतीच त्यांनी वर्धा जिल्ह्यातील आजनसरा येथे संत भोजाजी महाराज मठाला भेट देत येथे आपल्या विजयासाठी प्रार्थना केली. दुसरीकडे डॉ. किरसान मात्र पक्षाचे कार्यकर्ते, मतदारांच्या भेटी घेत त्यांचे आभार मानताना दिसत आहेत.

निकालावर परिणाम करणारे घटक

  • आमदार डॉ. नामदेव उसेंडी व डॉ. कोडवते दाम्पत्याचा भाजपत प्रवेश

  • मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील ओबीसींमध्ये नाराजीची सुप्त लाट

  • दहा वर्षांत जिल्ह्यात न झालेली विकासकामे

  • पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रचार वगळता जिल्ह्याकडे फिरवलेली पाठ

  • अद्याप पूर्ण न झालेले रेल्वे प्रकल्प, कार्यान्वित न झालेला पोलाद प्रकल्प, कागदावरच असलेले वैद्यकीय महाविद्यालय

  • सिंचन सुविधांचा अभाव असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

  • कृषिपंपांना पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्यानेही शेतकरी संतप्त

  • देसाईगंज-गडचिरोली रेल्वेचे भिजत घोंगडे

  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या जंगी सभा

  • विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वगळता काँग्रेसचा एकही मोठा नेता फिरकला नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com