हस्ताक्षरावरून पटली ओळख? गडचिरोलीच्या चकमकीत 'ते' चौघे ठार?

Naxal
Naxal

गडचिरोलीतील धानोरा तालुक्यामध्ये येणाऱ्या ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत 26 हून अधिक नक्षलवादी ठारे झाले. तर, चार जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी सकाळी पाच वाजल्यापासून सुरू असणाऱ्या या चकमकीतील मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. मात्र, संपूर्ण चकमकीच्या केंद्रस्थानी नक्षलवाद्यांचे चार मोठे नेते होते. त्यांचाही खात्मा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यामध्ये 'एमटी' टोपन नाव असणाऱ्या नक्षलवादी चळवळीतील एका मोठ्या नेत्याचा समावेश असल्याची शक्यता आहे. त्यासोबत विजय रेड्डी, जोगन्ना तसेच संदीप दीपकराव यांचीही नावं पुढे आली आहेत. यातील 'एमटी' व जोगन्ना हे नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचे सदस्य आहेत. मात्र, अद्याप पोलिसांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मृतदेह गोळा करून त्यांची डीएनए टेस्ट सुरू करून ओळख पटवणार असल्याचं प्राथमिक वृत्त आहे.

धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल या घनदाट जंगल परिसरात पोलिसांचे सी- ६० दल आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी सकाळी जोरदार गोळीबार झाला. या गोळीबारात २६ हून अधिक नक्षलवादी ठार झाल्याचे कळते. घटनास्थळी अद्याप पोलिसांची कारवाई सुरूच असून मृत नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सी-६० कमांडोची टीम कोटगुल परिसरातील मरभिनटोला गावाजवळच्या जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना तिथे दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला.

पोलिसांनीही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी पोलिसांनी अभूतपूर्व शौर्य दाखवत केलेल्या गोळीबारात २६ हून अधिक नक्षलवादी ठार झाल्याचे कळत आहे. तसेच ४ पोलिस जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सी-६० दलाच्या १५ ते १६ टीम या जंगल परिसरात असून अद्याप कारवाई सुरूच आहे.

एकनाथ शिंदे...विजय वडेट्टीवार ते नक्षलवाद्याचं हस्ताक्षर!

ठार झालेला 'एमटी' हा उच्चशिक्षित नक्षलवादी जंगलात कॉम्रेड एम, दीपक, बाबूराव तोफा आणि सह्याद्री या नावांनी वावरायचा. तसेच सह्याद्री या नावाने त्याने अनेकदा प्रसिद्धी माध्यमांना पत्रे पाठवली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांमध्ये वरिष्ठ नक्षलवाद्यांत छत्तीसगड व तेलंगणातील व्यक्तींचा भरणा अधिक आहे. त्यामुळे त्यांची पत्रे, पत्रके आणि बॅनर्स यातील भाषेत हिंदी व इतर शब्दांची घुसळण स्पष्ट जाणवायची.

मात्र, 'एमटी'चे मराठी भाषेवर प्रभुत्व होते. यामुळे त्याने सह्याद्री नावाने पाठवलेली पत्रे प्रमाण मराठी भाषेत असायची. चार दिवसांपूर्वी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांची धमकी न दिल्याची काही पत्रके प्रसिद्धी माध्यमांवर व्हायरल झाली होती. या नक्षलवाद्यांच्या पत्रांमध्ये मंत्री विजय वडेट्टीवार सूरजागड आंदोलनाच्या समर्थनाचे नाटक करत आहेत, असा आरोपही करण्यात आला होता.

या पत्रकातील भाषा 'एमटी' उर्फ सह्याद्रीच्या पत्रकातील भाषेशी तंतोतंत जुळणारी आहे. त्यामुळे हे पत्र त्याने जिल्ह्यात असतानाच लिहिल्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय काही दिवसांपूर्वी सूरजागड पहाडावर झालेल्या आंदोलनातही तो आला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com