Gadchiroli Water Crisis : गाव सोडा, शहरातही पाणीटंचाई गंभीर; धानोऱ्यातील दुर्गा चौकात टँकरने पाणीपुरवठा

धानोरा तालुक्यात व शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या प्रकर्षाने जाणवते. २०१५ मध्ये धानोरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले.
Gadchiroli Water Crisis
Gadchiroli Water Crisis Sakal

धानोरा : जिल्ह्यातील पाणी टंचाईची समस्या भीषण रूप धारण करत असून सिरोंचा, भामरागडसारख्या तालुक्यांतील अतिदुर्गम गावांमध्ये ही समस्या असताना धानोरासारख्या शहरातही टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देण्याची नागरिकांकडून करण्यात येत आहे.

धानोरा तालुक्यात व शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या प्रकर्षाने जाणवते. २०१५ मध्ये धानोरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. परंतु आजही उन्हाळा आला, की पिण्याच्या पाण्याची समस्या उग्र रूप धारण करत असते.

या शहरात आजही टँकरने पाणीपुरवठा केला जातो. धानोरा शहरांमध्ये दुर्गा चौक, इंदिरानगर, नवा प्लॉट एरिया या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांची आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे.

ग्रामीण भागात नळ योजनेचे जाळे विणले गेले आहे. परंतु धानोरा शहरातील विद्यानगरमध्ये आजही नळ योजना नाही. फक्त एका सार्वजनिक विहिरीवर सोलर पंप लावून २० ते ३० घरांपर्यंतच नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. विद्यानगर वाॅर्डात नळजोडणी नाही.

काही विशिष्ट ठिकाणी नळाचे पॉईंट देऊन आजूबाजूचे लोक पाणी घेत असतात बाकीच्या लोकांना तेही मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी दाहीदिशांत भटकावे लागत आहे. आम्हाला इतर कोणत्याही सुविधा नकोत फक्त पिण्यासाठी शुद्ध पाणी द्यावे,

अशी एकच मागणी येथील नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पिण्याच्या पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे जातीने लक्ष देऊन नागरिकांची या समस्येतून मुक्तता करावी एवढीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

ही समस्या यंदाची नसून मागील अनेक वर्षांपासून नागरिकांना दरवर्षी उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही नागरिकांची ही महत्त्वपूर्ण समस्या सोडविण्यासंदर्भात प्रशासनाकडून काहीही प्रयत्न होताना दिसत नाहीत.

आश्रमशाळेतील पाण्याची टाकी निरुपयोगी

रांगी येथील शासकीय आश्रमशाळेतील पाण्याची टाकी शोभेची वास्तू बनली आहे. परिणामी विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. येथील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना व कर्मचारी वसाहतींना सुरक्षित पाणीपुरवठा हवा यादृष्टीने संबंधित विभागाने पाणीपुरवठ्याची टाकी मंजूर करून देण्यात आली.

मात्र ज्या दिवसापासून टाकीचे बांधकाम झाले, पाइपलाइन टाकण्यात आली आणि पाइपलाइनद्वारे कर्मचारी वसाहती व विद्यार्थ्यांना काही दिवस पाणी पोहोचले. त्यानंतर अचानक पाइपलाइनमध्ये पूर्णत: खराब बिघाड निर्माण झाल्याने पाच ते सहा वर्षांपासून ती पाण्याची टाकी निरूपयोगी ठरली आहे. पाइपलाइन व व्हॉल्व्ह खराब झाल्याने त्या ठिकाणी बोअर मारूनसुद्धा तसेच तीन-तीन मोटार असूनसुद्धा टाकीमध्ये पाणी चढत नसल्याची समस्या आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com