Gambheri students from Melghat get good education
Gambheri students from Melghat get good education

एका शिक्षिकेत किती गुण; विद्यार्थ्यांच्या इंग्रजी प्रभुत्वासह मराठीत पीएच.डी., कविता लेखन, गायन आणि बरेच काही

मांजरखेड (जि. अमरावती) : ज्योती सावित्रीचे एकच स्वप्न... चला खरे तर बनवूया... अक्षर अक्षर जुळवूया... ज्ञानदीप हा उजळूया या स्वरचित काव्याप्रमाणे धारणी तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा गंभेरी येथील शिक्षिका प्रतिभा काठोळे (झळके) या विद्यादानाचे काम करीत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी व मराठी विषयात तर पारंगत बनविले आहे. 

सन २००१ मध्ये प्राथमिक शिक्षिका म्हणून रुजू झालेल्या प्रतिभा काठोळे यांनी वरुड येथील बोरगाव व जरुड कन्या शाळेत कार्य करताना १२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. त्यानंतर सन २०१६ मध्ये धारणी तालुक्यातील गंभेरी शाळेत स्थानांतर झाले. पूर्वी या शाळेतील विद्यार्थी केवळ स्थानिक भाषेतच बोलत होते. आता मात्र विद्यार्थ्यांनी मातृभाषेसह मराठी व इंग्रजी विषयावर प्रभुत्व मिळविले आहे.

आज त्यांच्या वर्गातील ९० टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय समजत असून, ७५ टक्के विद्यार्थी अस्खलितपणे संवाद साधतात. कोरोना काळातही काठोळे दाम्पत्याने स्थानिक भागात वास्तव्य करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.

स्वतः मराठी विषयात एम.फील व पीएच.डी. शिक्षण घेतले तरी प्रतिभा यांचा आवडीचा विषय इंग्रजी आहे. सेवेच्या सुरुवातीच्या सात वर्ष त्यांनी इंग्रजी प्रशिक्षण तज्ज्ञ म्हणून कार्य केले. कविता लेखन, गायन, संचालन, विद्रोही काव्य लेखन, कुशल अध्यापना सोबतच दोन कादंबरीचे समीक्षक लेखक म्हणून कार्य केले आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात त्यांनी स्वतः ‘शिक्षण हक्क’अंतर्गत सर्व विषयांचे समावेश असलेल्या दोन सुंदर गाण्यांची निर्मितीसह गायनही केले आहे.

५३ उपक्रमांची शाळा

केवळ विद्यार्थ्यांसाठी कार्यमग्न असणाऱ्या या शिक्षिकेला पुरस्कारात रुची नाही. तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता खरी कमाई असल्याचे त्या सांगतात. गंभेरीच्या शाळेतील उपक्रमामध्ये रेषा अक्षर, सूचक शब्द, ओळखा पाहू, अनुलेखन, आगगाडी इंजिन, सुंदर लिहा व गा, शारीरिक शिक्षणासाठी डोंगराला आग लागली, इंग्रजीत कृती व वाचन, पहा व बोला, आध्याक्षरांची शब्द साखळी, मी ॲण्ड माय फॅमिली, पिक्चर रीडिंग कृती, डू ॲण्ड डोन्ट ॲक्टीविटी आदी अनेक उपक्रमाच्या माध्यमातून येथील विद्यार्थी ‘प्रतिभा’ संपन्न होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com