आहे की नाही गंमत! पोलिसांना पाहून चक्क नदीत मारल्या उड्या

मुनेश्‍वर कुकडे
Wednesday, 16 September 2020

नवरगावजवळील नदीच्या कडेला असलेल्या जंगलात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जंगलात पोहोचले. या वेळी त्यांना जुगाराचा खेळ सुरू असल्याचे दिसले.

गोंदिया : तालुक्‍यातील नवरगावजवळील नदीच्या कडेला असलेल्या जंगलात जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांना पाहून काही जुगाऱ्यांनी नदीत उड्या टाकल्या. त्यापाठोपाठ पोलिसांनीदेखील नदीत उड्या टाकून जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. आणि जंगलात पाठलाग करून काहींना पकडले. ही कारवाई सोमवारी (ता.१४) सायंकाळी पाचच्या सुमारास केली.
ताब्यात घेण्यात आलेल्या नऊ आरोपींकडून ९ दुचाकींसह ६ लाख ४ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

नवरगावजवळील नदीच्या कडेला असलेल्या जंगलात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जंगलात पोहोचले. या वेळी त्यांना जुगाराचा खेळ सुरू असल्याचे दिसले. पोलिस पथक दिसताच काही जुगाऱ्यांनी जंगलात धूम ठोकली. त्यांना पोलिसांनी पाठलाग करीत पकडले. काही जुगाऱ्यांनी नदीत उड्या घेतल्या. त्यांच्या पाठोपाठ पोलिसांनीदेखील नदीत उड्या मारून जुगाऱ्यांना सिनेस्टाईल पकडले.

कमलेश सुरेंद्र बन्सोड (वय २८, रा. टेमनी), कोहिनूर छगनलाल वासनिक (वय ३४, रा. गुदमा), काजू अनंतराम हुकरे (वय ३६, रा. गुदमा), सतीश तेजराम मेंढे (वय ३१, रा. सुपलीपार), रितेश अरुण बोरकर (वय २६, रा. संजयनगर, गोंदिया), अजय जुगलकिशोर सोनकर (वय ३३, रा. शास्त्री वॉर्ड, गोंदिया), अभिषेक रिंकूसिंग बैस (वय २४, रा. गौतमनगर, गोंदिया), जितेंद्र मनमोहनसिंग पारासर (वय ३८, रा. छोटा गोंदिया), प्रवीण अशोक आंबेडारे (वय २८, रा. फुलचूर, गोंदिया) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

घटनास्थळाहून किसन दमाहे (रा. इर्री) हा त्याची बुलेटसह (एमएच ३५-ए. एफ. ३०८८) पसार झाला. तसेच जंगलात अन्य ४ ते पाच जण दुचाकी सोडून पळून गेले. या दुचाकी पोलिस पथकाने ताब्यात घेतल्या आहेत. या कारवाईत २२ हजार २४० रुपये रोख, ७ मोबाईल, ९ दुचाकी असा एकूण ६ लाख ४ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा - आहे की नाही चमत्कार! हात न लावताच वाजते इथली घंटा

यांनी केली ही कारवाई
पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, पोलिस उपनिरीक्षक आनंद बिचेवार, पोलिस कर्मचारी लिलेंद्र बैस, गोपाल कापगते, चंद्रकांत करपे, विजय रहांगडाले, भूवनलाल देशमुख, भुमेश्‍वर जगनाडे, रेखलाल गौतम, दिनेश लोधी, प्रवीण चामट, संतोष चव्हाण, रूपराम पटले, शशिकांत भेंडारकर, संजय हूड, विनोद हरिणखेडे यांनी ही कारवाई केली.

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gambler ran away from police