esakal | प्रेमीयुगुलाचा "गेम' करण्याची दिली होती सुपारी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

प्रेमीयुगुलाचा "गेम' करण्याची दिली होती सुपारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कुलर व्यापारी ऋषी खोसला आणि त्याची प्रेयसी मधू यांचा "गेम' करण्याची सुपारी मिकी बक्षीने दिली होती. कारमध्ये प्रेमीयुगुल जात असल्याची टीप मिळाल्यानंतर सहा आरोपींनी कारचा पाठलाग केला. मात्र, कारमध्ये एकटाच ऋषी सापडल्याने त्याचा खात्मा केला. सुदैवाने मधूची दुचाकी बिघडल्यामुळे ती बचावली, अशी माहिती सूत्रांनी दिली. ऋषी खोसला हत्याकांडात सदर पोलिसांनी आणखी चार आरोपींना अटक केली, अशी माहिती पोलिस उपायुक्त विनिता साहू यांनी पत्रपरिषदेत दिली.
राहुल ऊर्फ बबन राजू कळमकर (32, जिजामातानगर, खरबी), कुणाल ऊर्फ चायना सुरेश हेमणे (21, आझादनगर बिडगाव), आरीफ इनायत खान (21, रजा मशीदमागे खरबी) आणि अजीज अहमद ऊर्फ पांग्या अनीस अहमद (19, हसनबाग पोलिस चौकीमागे) अशी आरोपींची नावे आहेत. चारही आरोपी वाडी हद्दीतील एका धार्मिक स्थळी लपून होते. माहिती मिळताच पोलिस त्वरेने घटनास्थळी गेले आणि चौघांनाही ताब्यात घेतले, असेही साहू यांनी पत्रकारांना सांगितले.
.........
दोघांची दिली सुपारी
अनैतिक संबंधाला कंटाळून मिक्कीने ऋषी आणि मधूचा काटा काढण्याचे ठरविले होते. त्यानुसार त्याने गिरीश दासरवार याच्याशी संपर्क साधला. ऋषी आणि मधूचा गेम केल्यास भविष्यात चांगल्याप्रकारे आर्थिक मदत करीन असे आश्वासन मिक्कीने गिरीशला दिले होते. काही दिवसांपूर्वी राहुल ऊर्फ बबन कळमकर यास पैशाची गरज होती. त्याचा फायदा घेत गिरीशने मिक्‍कीच्या सांगण्यावरून बबनला ऋषी आणि मधूला मारण्याची सुपारी दिली.
.........
पाठलाग आणि खून
22 ऑगस्टला मध्यरात्री ऋषी मधूच्या घरून कारने घरी जात होता. त्यावेळी चारही आरोपींनी त्याचा पाठलाग सुरू केला. राहुल आणि आरिफ दुचाकीने तर अजिज आणि कुणाल ऑटोने पाठलाग करीत होते. 10 नंबर पुलाजवळ आरोपींनी ऋषीच्या कारला डॅश मारली. त्यावरून ऑटोचालकासोबत ऋषीचा वाद झाला. परंतु, त्याठिकाणी लोक गोळा झाल्याने आरोपींचा प्रयत्न फसला. गोंडवाना चौक ते नेल्सन मंडेला चौकदरम्यान सदोदय अपार्टमेंटसमोर ऋषीने कार थांबवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आरोपींनी त्याला गाठले आणि जागीच ठार केले.

loading image
go to top