गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट, मूर्ती घडविणारे हजारो हात आर्थिक संकटात

चेतन देशमुख
Thursday, 30 July 2020

विघ्नहर्त्या गणेशाच्या आगमनाचा मुहूर्त अवघ्या काही दिवसावरच आला आहे. परंतू तो कोरोनाच्या छायेतच साजरा होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदा मुर्तीशाळामधून गणेश मुर्त्यांची निर्मिती अत्यंत संथ गतीने होत आहे. टाळेबंदीमुळे बसलेला फटका व त्यात गणेश मुर्तीच्या उंचीसाठी राज्यशासनाने घालून दिलेल्या नियमांमुळे जिल्ह्यातील मुर्तीशाळा चालकांना तब्बल एक कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

यवतमाळ : कोरोनाचे सावट आगामी सण-उत्सवांवरही आहे. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. उत्सव काळात ती लागू असणार आहे. परिणामी गणेशोत्सव, महालक्ष्मी पूजन तसेच नवरात्रोत्सव कोरोनाच्या संकटात असल्याने मुर्तीकारापुढे अडचणीचा डोंगर उभा आहे.

विघ्नहर्त्या गणेशाच्या आगमनाचा मुहूर्त अवघ्या काही दिवसावरच आला आहे. परंतू तो कोरोनाच्या छायेतच साजरा होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदा मुर्तीशाळामधून गणेश मुर्त्यांची निर्मिती अत्यंत संथ गतीने होत आहे. टाळेबंदीमुळे बसलेला फटका व त्यात गणेश मुर्तीच्या उंचीसाठी राज्यशासनाने घालून दिलेल्या नियमांमुळे जिल्ह्यातील मुर्तीशाळा चालकांना तब्बल एक कोटी रुपयांचा फटका बसला आहे. यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यात 200 च्या जवळपास मुर्तीशाळा आहेत. या मुर्तीशाळांमधून हजारो मुर्तीकार व त्यांना सहायक म्हणून काम करणारे कामगार काम करतात.

एकट्या यवतमाळ शहरात आज घडीला छोट्या मोठ्या मुर्तीशाळा अस्तित्वात आहेत. परंतू या मुर्तीशाळा चालकांसमोर यंदा कोरोनाचे महासंकट उभे राहिले आहे. मुर्ती बनविण्यासाठी लागणारे साहित्य टाळेबंदीमुळे मिळालेले नसल्याने आहे त्या किंवा यवतमाळच्या बाजारपेठेत जे उपलब्ध झाले त्याच साहित्यावर मुर्तीकलेचे काम सुरू आहे. त्यामुळे मुर्तीशाळांमधून मुर्ती बनविण्याचे काम अत्यंत संथ गतीने होत आहे. याचा परिणाम आकर्षक व विविध आकाराच्या मुर्ती बनविणाऱ्यावर होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात मुर्तीकलेचे काम विविध ठिकाणी केले जाते. परंतू विभाग निहाय मुर्तीकलेचे व त्या ठिकाणी असलेल्या मुर्तीशाळांचे वेगळे हब तयार आहे. इतर जिल्ह्यातही याठिकाहून मुर्ती नेल्या जाते.

प्लास्टरबंदीमुळे मोठ्या मुर्तींचे काय ?
सहसा मोठ्या गणेश मुर्ती तयार करण्याचे काम नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत सुरू होते. यंदाही जिल्ह्यातील बहुतांश मुर्तीकारांनी मोठ्या व ऑर्डरच्या मुर्ती तयार केलेल्या नाही. परंतू राज्य शासनाने फेब्रुवारी महिन्यात राज्यात प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तींना बंदी आणल्यामुळे या मुर्तींचे आता पुढे काय ? हा प्रश्न मुर्तीकारांना पडला आहे. दरवर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्ती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येतात. मात्र, गेल्या वर्षी शहरात बंदी घातल्याने यंदा त्या मूर्तीची संख्या घटण्याची शक्‍यता आहे.

कामगारांचा रोजगार सुटला
मूर्तीकलेचे काम दरवर्षी डिसेंबर महिन्यापासून सुरू होते. ते गणेशोत्सव सुरू होईपर्यत चालते. वर्षातील सहा - सात महिने या कामगारांच्या हाताला काम असते. परंतू यंदा मुर्तीशाळांमध्ये मुर्ती बनविण्यासाठी साहित्य नसल्याने मुर्तीशाळा चालकांनी कामगारांनाही बोलवले नाही. दरवर्षी एका मुर्तीशाळेत 20 ते 25 कामगारांच्या हाताला काम असायचे आता ते काम चार ते पाच जणांवर भागविले जात आहे.

सविस्तर वाचा - Video : ऐ वतन, मेरे वतन आबाद रहे तु...सुटीवर आलेला जवान देतोय सैन्य भरतीचे धडे

ऑर्डरच नाही
यंदा टाळेबंदीमुळे मुर्ती तयार करण्याचे काम अर्ध्यावर आले आहे. मी दरवर्षी तीनशे ते चारशे छोट्या तर दहा ते बारा ऑर्डरच्या मोठ्या मुर्ती करायचो. यंदा आतापर्यंत एकही मुर्ती तयार केली नाही. कोरोनामुळे सार्वजनिक तसेच घरगुती एकाही मूर्तीची ऑर्डर आलेली नाही.
विजय माहूरे, मूर्तीकार,बोरी अरब

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganeshotsav in Corona shadow