esakal | हे काय? खंडेलवाल कुटुंबीयांनी केली 171 गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

हे काय? खंडेलवाल कुटुंबीयांनी केली 171 गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा

sakal_logo
By
भूषण काळे

अमरावती : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तथा घरोघरी एकच गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याचे प्रत्येकाने बघितले आहे. मात्र, अंबानगरीतील खंडेलवाल कुटुंबीयांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 171 गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली आहे. वाचून आश्‍चर्य वाटले ना. होय, पण हे सत्य आहे. विशेष म्हणजे, 20 वर्षांपासून त्यांचा हा अभिनव उपक्रम सुरू आहे.
राजेश खंडेलवाल व सुनीता खंडेलवाल असे या दाम्पत्याचे नाव आहे. अमरावती शहरातील श्रीकृष्णपेठेतील त्यांच्या आलिशान बंगल्यात गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून संपूर्ण घर सजविण्यात आले आहे. 20 वर्षांपूर्वी 11 गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून त्यांनी या अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली होती. दरवर्षी वेगवेगळी सजावट करून गणेश उत्सवाचा सण हर्षोल्हासात खंडेलवाल कुटुंबीय साजरा करतात. यंदा जल-कमळ ही थीम घेऊन त्यांनी संपूर्ण घराची सजावट करून निरनिराळ्या ठिकाणी गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली आहे. त्यांच्या या उपक्रमाची शहरात जोरदार चर्चा असून विक्रमाकडे त्यांची वाटचाल सुरू आहे.
दैनंदिन जीवनातील मनुष्याच्या विविध हावभावांचे हुबेहूब दर्शन घडविणाऱ्या 171 गणेशमूर्ती या कुटुंबीयांकडे आहेत.
पर्यटनानिमित्त देशात फिरताना विविध राज्यांतील भौगोलिक प्रदेशानुसार तेथे उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या गणेशमूर्ती खरेदी करून दरवर्षी त्या मूर्तींची स्थापना ते करतात. त्यांच्या या छंदामुळे अनेकांनी त्यांना निरनिराळ्या प्रकारच्या गणेशमूर्ती भेट दिल्या आहेत. या सर्व गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा गणेश चतुर्थीला केली जाते. सुनीता खंडेलवाल यांना कलाकुसरीची आवड असल्याने त्यांनी आपला छंद जोपासला आहे. आपल्या कल्पक बुद्धिमत्तेला चालना देत त्या दरवर्षीच कलाकुसर करून गणेश उत्सव साजरा करतात. त्यांच्यासह त्यांचा मुलगा सागर, स्नुषा भाग्यश्री व मुलगी मेघना यादेखील हिरिरीने कलाकुसरीत हातभार लावतात.

गणेशमूर्तींचा भंडार
खंडेलवाल कुटुंबीयांकडे साखर, गूळ, संगमरवर, लाकूड, लोखंड, डायमंड, पितळ, माती, कुंदन आदी प्रकारच्या मूर्ती आहेत. गणेशोत्सवाची आतुरतेने वाट पाहणारे खंडेलवाल कुटुंबीय तीन महिन्यांपासूनच कलाकुसरीच्या कामाला लागतात.

loading image
go to top