गावगुंडाने पोलिसाला बदडल्याचा व्हिडीओ व्हायरल होतो तेव्हा... 

सूरज पाटील 
Friday, 28 August 2020

एका दारू तस्कराने पोलिस कर्मचाऱ्याला भररस्त्यात लाथाबुक्‍क्‍यांचा प्रसाद देत खाकीचे धिंडवडे काढल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे यवतमाळ पोलिस दलाची प्रतिमा आणखी मलिन झाली आहे.

यवतमाळ : कोरोनाच्या संकट काळात पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य इमानइतबारे पार पाडले. त्याबद्दल जनतेने तोंड भरून कौतुक करीत फुलांचा वर्षाव केल्याचे चित्र बघितले. मात्र, अलीकडे पोलिस व गुन्हेगारी वर्तुळातील संबंध अधिकच दृढ होत चालले आहेत. आपले काहीच होणार नाही, या समजातून चक्क पोलिस कर्मचाऱ्यांच्या खाकी गर्दीवर वारंवार हात उगारला जात आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची हमी कुणाकडून ठेवायची, असा प्रश्न विचारला जात आहे. 

एका दारू तस्कराने पोलिस कर्मचाऱ्याला भररस्त्यात लाथाबुक्‍क्‍यांचा प्रसाद देत खाकीचे धिंडवडे काढल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे यवतमाळ पोलिस दलाची प्रतिमा आणखी मलिन झाली आहे. यवतमाळ येथील बाजोरियानगरलगतच्या विदर्भ हाउसिंग सोसायटीत वर्दीवर असलेल्या एका मद्यपी पोलिस कर्मचाऱ्यासोबत वाद झाल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुंडाने भररस्त्यात पोलिसाला बदडले व रस्त्यावर लोळवून धिंगाणा घातला. पोलिसच मार खातोय हे बघून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. हा खळबळजनक प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित झाला असून, तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

पोळ्याच्या कालावधीतील ही घटना असल्याची माहिती आहे. भोसा मार्गावर वंदे मातरम चौकानजीक वास्तव्यास असलेला हा पोलिस कर्मचारी सध्या पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर आहे. यापूर्वी घाटंजीमध्ये त्याची कारकीर्द वादग्रस्त ठरल्याने त्याला मुख्यालयात जोडले गेले. मात्र, येथेही त्याने गावगुंडांसोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. एका गुन्ह्यात कारागृहातून बाहेर आलेल्या गुंडाने विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसरात चांगलाच जम बसविला आहे. सदर पोलिसाची त्याच्यासोबत हातमिळवणी झाली. मात्र, मित्राशी दारूच्या नशेत बाचाबाची झाल्याने पोलिसाला मार खावा लागला. 

अवश्य वाचा- हाय रे दैवा! आई देखत चिमुकलीला बिबट्याने पळविले
 

हा प्रकार एका नागरिकाच्या मोबाईलने कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. पोलिसाला गुंडाने बदडले तरी कुठलीही तक्रार झाली नाही, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. काही दिवसांपूर्वी वाळूतस्करीत जम बसविलेल्या गुंडाने बाभूळगाव येथे पोलिसांना मारहाण केली. तर जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जोडमोहा येथे हल्ला करण्यात आला. हिवरी येथेही ग्रामीण पोलिस ठाण्याच्या दोन पोलिसांना मारहाण करण्यात आली. साखरा येथे पोलिस पाटलाच्या खुनाचा प्रयत्न झाला. वारंवार हल्ल्यासारख्या गंभीर घटना घडत असताना पोलिस प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जाताना दिसत नाही. मात्र, पालकमंत्री संजय राठोड यांनी व्हायरल व्हिडीओची गंभीर दखल घेतली आहे. 

अवश्य वाचा- काय सांगता! वाघिणीने बछड्यांसह रस्त्याने मारला फेरफटका... 
 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ मी बघितला आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना माहिती दिली. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनाही याबाबत विचारणा करण्यात येईल. पोलिस कर्मचारी दोषी आढळून आल्यास निश्‍चित कारवाई करण्यात येईल. 
- संजय राठोड, वनमंत्री तथा पालकमंत्री, यवतमाळ.  
 

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A gangster Beaten a police man, The video viral