आसाम, ओडिसा, आंध्रातून गांजाची ‘खेप’

सूरज पाटील
शनिवार, 23 जून 2018

गुन्हेगारी रोखण्यासाठी अंमलीपदार्थाच्या आहारी गेलेल्यांवर कारवाई करण्यात आली. विक्रेत्यांसह तस्करांच्या ठिकाणांची माहिती मोहीम राबवून त्यांची कुंडलीही तयारी करण्यात आली आहे. लवकरच योग्य तो ‘रिझल्ट’ बघावयास मिळेल.
-पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी, यवतमाळ. 

यवतमाळ : शहरात वाढत्या गुन्हेगारीने डोकेवर काढल्याने पोलिसांवर कामाचा ताण वाढला आहे. अल्पवयीन मुलांसह तरुणाई गांजाच्या आहारी गेल्याने त्यांचा शिरकाव गुन्हेगारीत झाला. आसाम, ओडिसा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्लीतून यवतमाळात गांजाची ‘खेप’ पोहोचत आहे. त्यामधून महिन्याला कोट्यवधींची उलाढाल होत आहे. 

नागपूर, पुणे, मुंबईनंतर आता यवतमाळलाही गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जात आहे. येथे घडलेल्या रक्तरंजित हत्याकांडाने राज्याला हादरा दिला. गेल्या जानेवारी महिन्यापासून शहरात घडलेल्या खुनांच्या घटनांमुळे पालकवर्ग चिंतित सापडला आहे. विशेष म्हणजे बहुतांश खून प्रकरणात विधिसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याची धक्कादायक बाब समोर आली. पोलिसांनी गुन्हेगारीवर अंकुश मिळविण्यासाठी पेट्रोलिंग राबविली. त्यात धक्कादायक वास्तव समोर आले. ते म्हणजे अल्पवयीन मुलांना अंमलीपदार्थ सेवनाची जडलेली सवय. शहरातील मोकळे मैदान अंमलीपदार्थ सेवनाचे अड्डे बनले आहेत. पोलिसांनी धडक मोहीम राबवून गांजा ओढणार्‍यांवर कारवाईचा फास आवळला. मात्र, गांजा विक्री करणार्‍यांवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झाली नाही. शहराच्या चारही बाजुंनी गांजाची विक्री खुलेआम सुरू असताना पोलिसांना याची भनक लागू नये, याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

आसाम, दिल्ली, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिसा आदी प्रमुख राज्यांतून चोरट्या मार्गाने गांजा आलिशान वाहनांतून बिनदिक्कत यवतमाळ शहरात आणला जात आहे. आसाम, ओडिसाचा गांजा दर्जेदार राहत असल्याने शौकिनांची त्याला मागणी आहे. मध्य प्रदेशातील गांजातून चरस काढली जाते. नशा कमी येत असल्याने त्यावर केमिकलचा मारा केला जातो. हे रसायन सर्वांत घातक असून, सेवन केल्यानंतर बधिरता येते. त्यामुळे नशेत झिंजणार्‍या तरुणाईच्या हातून गंभीर गुन्हे घडत आहेत.

गांजा ठोक विक्रीत प्रमुख दहा ते 15 तस्कर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चिल्लर विक्री केंद्र जवळपास 30 आहेत. कळंब चौक, लोखंडी पूल, तलाव फैल, आरटीओ कार्यालय परिसर, लोहारा, वडगाव, अंबिकानगर, पाटीपुरा आदी भागांत गांजा विक्रेत्यांसह शौकिनांचा वावर सर्वाधिक आहे. पोलिस दलातील पथकाला गांजाविक्री व तस्करीची इत्थंभूत माहिती आहे. विशेष म्हणजे एका पथकात ठाण मांडून असलेल्या कर्मचार्‍याच्या वाहनाचा वापरही तस्करीसाठी करण्यात आल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे. ‘अर्थपूर्ण’ संबंध कारवाईत अडथळा आणत नाहीत ना, अशी शंकादेखील उपस्थित केली जात आहे.

शेतात उतरविला जातो माल
परराज्यांतून गांजाची खेप आणत असताना कुणालाही संशय येऊ नये, यासाठी वाहनात पती-पत्नी बसून असल्याचा देखावा निर्माण केला जातो. ग्रामीण पेहराव राहत असल्याने सहसा तस्करीचा संशय येत नाही. पाच किलो व दहा किलोच्या पॅकींगमध्ये आणलेला हा माल शहराबाहेर असलेल्या म्होरक्यांच्या अथवा निकटवर्तीयांच्या शेतात उतरविला जातो आणि तेथून चिल्लर विक्रीसाठी शहरात येतो.

गुन्हेगारी रोखण्यासाठी अंमलीपदार्थाच्या आहारी गेलेल्यांवर कारवाई करण्यात आली. विक्रेत्यांसह तस्करांच्या ठिकाणांची माहिती मोहीम राबवून त्यांची कुंडलीही तयारी करण्यात आली आहे. लवकरच योग्य तो ‘रिझल्ट’ बघावयास मिळेल.
-पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी, यवतमाळ. 

Web Title: ganja come in maharashtra to assam andhra pradesh