

चंद्रपूर : शहरातील कचरा संकलनाच्या निविदा प्रक्रियेत महानगर पालिकेतील सत्ताधारी भाजपने आर्थिक गैरव्यवहार केला आहे. या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. अन्यथा कॉंग्रेसतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशारा कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कचरा संकलनासाठी निविदा मागितल्या. या कामासाठी मे. स्वयंभू ट्रान्स्पोर्ट, पुणे यांच्यासह अन्य पाच कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या. त्यातील दोन निविदा तांत्रिक पूर्तता न केल्याने रद्द करण्यात आल्या. उर्वरित चार निविदांत मे. स्वयंभूचा दर 1700 रुपये प्रती मेट्रीक होता. स्थायी समितीने या संस्थेला काम मंजुर केले.
मात्र, नंतर ही सर्व प्रक्रियाच रद्द करण्यात आली. मनपा प्रशासनाने या कामासाठी पुन्हा ई-निविदा मागितल्या. यावेळी हे काम 7 वर्षे आणि वाढीव 3 वर्षे असे एकूण दहा वर्षांकरिता देण्यात येणार असल्याचा बदल केला. आधी काम मंजूर झालेल्या मे. स्वयंभू ट्रान्स्पोर्ट, पुणे या कंत्राटदारासह अन्य तीन कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या. त्यातील एका कंत्राटदाराची निविदा तांत्रिक कारणांमुळे रद्द झाली.उर्वरित तीन निविदा उघडण्यात आल्या. त्यात मे. स्वयंभू ट्रान्स्पोर्ट, पुणे या संस्थेचा सर्वांत कमी दर होता. मात्र, आधी मंजूर झालेल्या कंत्राटातील दरात तब्बल आठशे रुपयांनी वाढ करीत कंत्राटदाराने 2552 एवढी रक्कम नमूद केली आहे. हे स्वयंभूची निविदा स्थायी समितीने मंजुर केली. यासर्व प्रकरणात मोठे अर्थकारण झाले आहे, असा आरोप तिवारी यांनी केला.
राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मनपात सत्तेत आलेल्या त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कचरा संकलनात मोठा घोटाळा केला आहे. यातून भाजपचा पारदर्शकतेचा फुगा पूर्णपणे फुटला आहे. यासर्व घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, विभागीय आयुक्त नागपूर, नगरविकास मंत्रालय यांच्याकडे केली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी न झाल्यास शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे तिवारी म्हणाले. पत्रकार परिषदेला नगरसेवक प्रशांत दानव, कॉंग्रेस कमिटीच्या शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, कॉंग्रेस ओबीसी सेलचे नरेंद्र बोबडे, राजेश अड्डूर आदी उपस्थित होते.
गैरव्यवहाराचे आरोप बिनबुडाचे - महापौर
चंद्रपूर ता. कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी कचरा संकलनाच्या निविदा प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप महापौर राखी कंचर्लावार, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनी पत्रकार परिषदेत फेटाळून लावले. नव्या निविदा प्रक्रियेतील तरतुदीन नुसार कचरा संकलनात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. आधी घटा गाडीने कचरा संकलन व्हायचे. आत त्यासाठी चारचाकी वाहनांचा वापर केला जाणार आहे. शहरात यापूर्वी सहाशेवर कचरा कुड्या होत्या. त्याची संख्या आता शंभरावर आली आहे. त्या सुद्धा कमी करण्यासाठी नवा निविदेतील तरतुदीचा वापर होणार आहे, असे महापौर यांनी सांगितले.
स्वयंभूने आधी 1700 रुपये प्रती मेट्रीक टनाचे दर दिले होते. मात्र यात दरात कामगारांना किमान वेतन देणे शक्य नव्हते. कचरा संकलनाचा "बेस रेट' जवळपास 2200 रुपये प्रती मेट्रीक टन आहे. त्यामुळे ही निविदा रद्द करण्यात आली. नवे दोन हजार 552 चे दर केवळ स्वयंभूनेच दिले होते. त्यामुळे त्यांनाच निविदा मंजुर करण्यात आली. यात कोणताही गैरव्यवहार झाला नाही. उलट महिन्याला दहा ते पंधरा लाख रुपये मनपाचे बचत होणार आहे, असा दावाही पावडे यांनी केला. पहिल्या करारानुसार 10 वर्ष स्वयंभूला काम दिले जाणार होते. यात नागरिकांकडून कचरा संकलनाचे शुल्क वसूल केले जाण्याची तरतूद होती. परंतु शहरवासींवर भुर्दंड नको म्हणून ती काढून टाकण्यात आली. आता नव्या प्रक्रियेत केवळ सात वर्षांचे कंत्राट दिले आहे. जवळपास तीनशेच्यावर कामगार काम करतात. ते शहरातीलच लोक आहे. यातील एकालाही कामावरून कमी केले जाणार नाही. उलट नव्या निविदेनुसार त्यांना किमान वेतन देणे शक्य होणार आहे.
नव्या कचरा संकलन प्रक्रियेत कुणाच्या घरासमोर दोनतासापर्यंत कचरा राहणार नाही, अशी तरतूद केली जाईल. कचरा उचलून थेट डेपोपर्यंत पोचविण्याची सुविधा यात राहणार आहे. कचरा संकलन करणाऱ्या वाहनांवर ध्वनिक्षेपकाची व्यवस्था राहील. मनपाच्या अनेक योजनांची माहिती यातून नागरिकांपर्यंत पोचविली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला गटनेते वसंता देशमुख होते.
विरोधी पक्षनेते, नगरसेवक कुणाचे?
गैरव्यवहाराचा विषय असताना मनपातील कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते डॉ. सुरेश महाकुलकर आणि नगरसेवक पत्रकार परिषदेला गैरहजर होते. शहर अध्यक्ष तिवारी यांनी डॉ. महाकुलकर बाहेर गावी असून नगरसेवकांना बोलविले नाही, असे सांगितले. मात्र दुसरीकडे महापौर राखी कंचर्लावार यांनी डॉ. महाकुलकर आणि कॉग्रेसचे नगरसेवक आमच्या सोबत असल्याचा दावा केला. निविदा प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार झाला नाही. त्यामुळे कॉंग्रेस नगरसेवकांचा याला पाठिंबा असल्याचे राहुल पावडे यांनी सांगितले. स्थायी समितीने ही निविदा मंजुर केली.स्थायी समितीत कॉंग्रेसचे तीन नगरसेवक आहे. यापैकी एकही पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हता. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते पक्षाचे की कंत्राटदाराचे असा प्रश्न कॉग्रेसच्या वर्तुळात चर्चिला जात आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.