
Gathering of Alcoholics : चक्क ‘मद्यपीं’चे संमेलन होणार अमरावतीला; आजी-माजी मद्यपींचा राहणार सहभाग
अमरावती - समाजाच्या विविध स्तरावर कार्य करणाऱ्यांचे संमेलन आजवर आपण ऐकले आणि पाहिले असेल. मात्र आता अमरावती शहरात चक्क मद्यपींचे संमेलन होणार आहे. विशेष म्हणजे या संमेलनाला आजी व माजी मद्यपी उपस्थित राहून अनुभव कथन करणार आहेत.
समाजात दारूची समस्या बिकट रूप धारण करीत आहे. अनेकांचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होत आहेत. अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावण्याचे प्रमुख कारण म्हणजे मद्य आहे. यासोबतच महत्त्वाचे म्हणजे आरोग्याची समस्या आहे. मद्यपी व्यक्तीला कालांतराने होणाऱ्या आजारामुळे केवळ तोच प्रभावित होतो असे नाही तर त्याचे अख्खे कुटुंब प्रभावित होत असते. मग पोराबाळांची आबाळ, खर्चाला पैसे नसल्याने पती-पत्नीतील भांडणे, वादविवाद असे अनेक टप्पे यामध्ये निर्माण होत असतात.
विशेष म्हणजे मद्यापासून होणाऱ्या या दुर्दशेची कल्पना मद्यपींना देखील असते. मात्र कुणीही दिलेले सल्ले ऐकण्याच्या मनःस्थितीत ते नसतात. त्यामुळे कुटुंबीयसुद्धा त्रस्त होतात. अशा परिस्थितीत अल्कोहलिक्स अॅनानिमस या संस्थेच्या पुढाकारातून शहरातील जवळपास २०० युवक व नागरिकांना स्वतःला आलेल्या वाईट अनुभव दुसऱ्यांना येऊ नये, या हेतूने या चळवळीत आपले सहकार्य दिले आहे.
मद्याच्या आहारी गेलेल्या मात्र मद्यापासून मुक्तता मिळविलेले डॉक्टर्स, प्राध्यापक, अभियंते तसेच सर्वसामान्यांचा समावेश आहे. ही मंडळी या संमेलनाच्या माध्यमातून त्यांना स्वतःला आलेले अनुभव कथन करून दुसऱ्यांना मद्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणार आहेत. शनिवारी (ता.१०) शहरातील नवाथे रेल्वे क्रॉसिंग परिसरातील साईकृष्ण मंगलकार्यालयात दुपारी हे संमेलन होणार आहे.
नाव सांगतात दारुड्या...
विशेष म्हणजे, अशाप्रकारचे अधिवेशन आतापर्यंत पुणे, नागपूर येथे झालेले आहे. आता अमरावतीमध्ये होणार आहे. या अधिवेशनातील मार्गदर्शक असलेली व्यक्ती स्वतःचे आडनाव न सांगता केवळ आपले नाव आणि नावासमोर दारुड्या, हा शब्द आवर्जून लावतात. त्यामुळे सभागृहात उपस्थित अन्य मद्यपींचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, असे आयोजकांचे म्हणणे आहे.